‘क्राइम पॅट्रोल’ फेम अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला; चाकू अन् लोखंडी रॉडने केला वार
'मेरी कॉम', 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेता राघव तिवारीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. मुंबईतील वर्सोवा परिसरात एका बाइकस्वाराने राघववर हा हल्ला केला आहे. चाकू आणि रोखंडी रॉडने राघववर हल्ला झाला असून त्यात तो जखमी झाला आहे.
‘मेरी कॉम’ या चित्रपटात आणि ‘क्राइम पॅट्रोल’ या मालिकेत काम केलेला अभिनेता राघव तिवारीवर शनिवारी हल्ला करण्यात आला. मुंबईतील वर्सोवा परिसरात राघववर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात राघव जखमी झाला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात आरोपी मोहम्मद जैद परवेझ शेखविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 118 (1) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नाही. राघवने याप्रकरणी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. आरोपी अजूनही माझ्या इमारतीजवळ बिनधास्त मोकळेपणे फिरताना दिसतो, मात्र पोलिसांनी त्याला अजून अटक केली नाही, असं तो म्हणाला. इतकंच नव्हे तर मला किंवा माझ्या कुटुंबीयांना काही झालं, तर त्यासाठी पोलीस जबाबदारी असतील, असा इशारा त्याने दिला.
या हल्ल्याबद्दल सांगताना राघव म्हणाला, “मी माझ्या मित्रासोबत शॉपिंग करून घरी परतत होतो. तेव्हा रस्ता पार पकताना माझी एका बाइकशी टक्कर झाली. यात माझी चूक होती म्हणून मी लगेच माफी मागितली आणि पुढे निघालो. मात्र बाइकस्वारने मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मी त्याला जाब विचारला असता तो बाइकवरून उतरून रागारागात माझ्या दिशेने धावून आला. त्याने दोन वेळा धारदार चाकूने माझ्यावर हल्ला केला. यातून मी कसाबसा वाचलो, तितक्यात त्याने मला जोरात लाथ मारली. यामुळे मी रस्त्याच्या कडेला खाली पडलो.”
View this post on Instagram
“मी खाली पडताच आरोपीने त्याच्या बाइकच्या डिक्कीतून दारूची बाटली आणि लोखंडी रॉड काढला. माझा बचाव करण्यासाठी मी रस्त्याच्या बाजूला पडलेली काठी उचलली आणि त्याच्या हातावर वार केला. यामुळे त्याच्या हातातली काचेची बाटली खाली पडली, पण त्याने लोखंडी रॉडने माझ्या डोक्यावर दोन वेळा हल्ला केला. यामुळे मला बरीच दुखावत झाली”, असं त्याने पुढे सांगितलंय.
राघव तिवारीने ‘चलो दिल्ली’, ‘मेरी कॉम’, ‘पुष्कर लॉज’ आणि ‘रणथंबोर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. तर ‘सास बहू और फ्लेमिंगो’, ‘द ट्रायल’ आणि ‘जेंगाबुक द कर्स’ यांसारख्या वेब सीरिजमध्येही त्याने भूमिका साकारल्या आहेत.