तुझं सामान घेऊन जा अन्यथा..; म्हणणाऱ्या निखिलला कोर्टाचा दणका, दलजीतला तात्पुरता दिलासा
दलजीत कौरने गेल्या वर्षी केन्यामधील बिझनेसमन निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं. निखिलचंही हे दुसरं लग्न असून त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. दलजीतसोबत झालेलं लग्न हे हिंदू विवाहपद्धतीनुसार असून कायदेशीररित्या त्याला मान्यता नसल्याचं निखिलने म्हटलंय.
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौरचं वैवाहिक आयुष्य गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. दलजीतने गेल्या वर्षी केन्यातील बिझनेसमन निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं. मात्र लग्नाच्या दहा महिन्यांतच ती पतीला सोडून भारतात परतली. काही महिने याविषयी मौन बाळगल्यानंतर दलजीतने तिच्या पतीवर विवाहबाह्य संबंधाचा आरोप केला. इतकंच नव्हे तर निखिलने लग्नाला मान्यता देण्यास नकार दिल्याचंही तिने म्हटलंय. दलजीतचे हे सर्व आरोप निखिलने फेटाळले आहेत. ज्या दिवशी दलजीत तिच्या मुलाला घेऊन घर सोडून गेली, तेव्हाच आमचं नातं संपुष्टात आलं होतं, असं निखिलने एका मुलाखतीत सांगितलं. त्याचप्रमाणे दलजीतसोबत हिंदू विवाहपद्धतीनुसार लग्न झालं असून कायदेशीररित्या आम्ही एकमेकांना बांधिल नाही आहोत, असंही त्याने म्हटलंय. दलजीतचं काही सामान अजूनही निखिलच्या केन्यातील घरी आहे. याविरोधात त्याने तिला कायदेशीर नोटीस बजावली होती. हे सामान घेऊन गेली नाही तर ते मी एनजीओमध्ये दान करेन, असा इशारा त्याने दिला होता. याविरोधात दलजीतने नैरोबी शहर कोर्टात दाद मागितली असून कोर्टाने तिला स्थगितीचा आदेश दिला आहे.
कोर्टाच्या या आदेशात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहेत. या केसमध्ये तात्काळ हस्तक्षेपाची गरज असून कोर्टाने ही बाब तातडीची मानली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, कोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत निखिल पटेल, त्याचे एजंट, कर्मचारी आणि नोकर यांना दलजीत आणि तिच्या मुलाला घराबाहेर काढण्यापासून किंवा त्यांच्या वैयक्तिक वस्तूंशी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार करण्यापासून रोखण्यासाठी मनाई आदेश जारी केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 28 जून रोजी होणार आहे. यावेळी दोन्ही पक्षांना त्यांचे युक्तीवाद सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे.
View this post on Instagram
याआधी निखिल पटेलने दलजीतला कायदेशीर नोटीस बजावून घरातील तिचं सर्व सामान परत घेऊन जाण्यास सांगितलं होतं. मात्र आता पुढील न्यायिक पुनरावलोकन होईपर्यंत या नोटीशीच्या अंमलबजावणीवर कोर्टाने स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे दलजीतला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. दलजीत नुकतीच केन्याला गेली होती. तिथे मैत्रिणींची भेट घेतल्यानंतर तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर ती एकटीच भारतात परतली.