सुटकेस घेऊन वणवण भटकतेय अभिनेत्री; पतीचा लग्नाला मान्यता देण्यास नकार, विवाहबाह्य संबंधाचा आरोप
दलजीतने निखिलवर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नव्हे तर तो लग्नही स्वीकारण्यास तयार नसल्याचं तिने म्हटलं आहे. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिने आणखी एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिचे सुटकेस पहायला मिळत आहेत.
‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दलजीत कौर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. दलजीतच्या वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण झाल्या असून ती मुलासोबत पतीचं घर सोडून भारतात परतली आहे. सुरुवातीचे काही महिने मौन बाळगल्यानंतर आता ती सोशल मीडियाद्वारे पतीवर विवाहबाह्य संबंधाचे आरोप करतेय. दलजीतने याआधीच्या काही पोस्टमध्ये पती निखिल पटेलवर बरेच आरोप केले आहेत. इतकंच नव्हे तर निखिलने लग्नच मानण्यास नकार दिल्याचं ती म्हणतेय. आता इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिने आणखी फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिचे सुटकेस पहायला मिळत आहेत. या फोटोवर तिने लिहिलं, ‘आयुष्य सुटकेसमध्ये घेऊन फिरतेय.. चार महिन्यांपासून हे असंच सुरू आहे.’ हा फोटो पाहिल्यानंतर दलजीतची व्यथा स्पष्ट समजतेय. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
लग्नानंतर दलजीत मुलाला घेऊन पतीसोबत केन्यामध्ये राहत होती. मात्र दहा महिन्यांतच ती भारतात परतली. निखिलचे SN नावाच्या मुलीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप तिने केला आहे. दलजित सध्या मुलासोबत भारतात राहत असून निखिल केन्यामध्येच आहे. याआधीच्या पोस्टमध्ये तिने लिहिलं होतं, ‘माझे कपडे तिथेच आहेत, माझा चुडा तिथे आहे, माझं मंदिर, माझ्या सगळ्या गोष्टी तिथेच आहेत. किंबहुना माझ्या मुलाचे कपडे, पुस्तकं आणि वडिलांवर असलेली त्याची आशासुद्धा तिथेच आहे. ते माझं सासर आहे, मी केलेली पेंटिंग तिथे आहे, पण माझा पती म्हणतोय की ते घर माझं नाही. तो म्हणतोय की आम्ही कधी लग्नच केलं नाही. तो माझा पती नाही का? तुम्हाला काय वाटतं? निखिल माझा पती नाही का? आम्ही लग्न केलं नाही का?’
दलजीत कौरची पोस्ट-
हा फोटो पाहिल्यानंतर दलजीत घरासाठी वणवण भटकत असल्याचं समजतंय. तिच्या आरोपांवर अद्याप निखिलकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. दलजितने मार्च 2023 मध्ये बिझनेसमन निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं. याआधी तिने टीव्ही अभिनेता आणि ‘बिग बॉस 16’चा माजी स्पर्धक शालीन भनोतशी लग्न केलं होतं. 2015 मध्ये शालीन आणि दलजित विभक्त झाले. या दोघांना एक मुलगा आहे. तर निखिलचंही दलजितसोबत हे दुसरं लग्न आहे. पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुली आहेत.