प्रेक्षकांच्या लोकप्रिय मालिकांचे दत्तजयंती विशेष महाएपिसोड; भक्तांसाठी भक्तीमय संध्येचा अनुभव
15 डिसेंबरला प्रेक्षकांना त्यांच्या आवडीच्या मालिकांचे दत्तजयंती विशेष एका तासाचे महाएपिसोड 'कलर्स मराठी'वर पाहायला मिळणार आहेत. यानिमित्ताने भक्तांना 'भक्तीमय संध्या'चा अनुभव घेता येणार आहे.
‘कलर्स मराठी’ वाहिनी येत्या रविवारी प्रेक्षकांसाठी भक्तीमय पर्वणी घेऊन येणार आहे. ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘आई तुळजाभवानी’ आणि ‘इंद्रायणी’ या मालिकांमध्ये दत्तजयंती विशेष भाग पार पडणार आहेत. ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत स्वामींचं दत्तरुप पाहायला मिळेल. ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत देवीच्या रक्षणासाठी त्रिदेव भूतलावर अवतरणार असून ‘इंद्रायणी’ या मालिकेत दत्तजयंती स्पेशल इंदूचं कीर्तन पाहायला मिळेल. एकंदरीतच 15 डिसेंबरला दुपारी 12 वाजल्यापासून ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर भक्तांना ‘भक्तीमय संध्या’चा अनुभव घेता येणार आहे.
‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेचा श्री दत्त जयंती विशेष महाएपिसोड दत्तभक्तांसाठी आनंद देणारा ठरणार आहे. या भागात स्वामींच्या अलौकिक श्रीदत्त रुपाचे मनोहारी दर्शन प्रेक्षकांना घडेल. “आम्ही आहोत दत्त गुरु, आम्हीच होतो नृसिंह सरस्वती आणि आम्हीच आहोत स्वामी समर्थ” या उक्तीचा प्रत्यय भक्तांना येणार असून दत्त परंपरेचा स्वामींच्या अलौकिक लीलेने घडणारा हा दैवी साक्षात्कार याची देही याची डोळा अनुभवण्याचा क्षण आहे. प्रत्येक दत्तभक्तांनी आवर्जून अनुभवावा असा हा अविस्मरणीय श्री दत्त जयंती विशेष भाग ज्यामध्ये भक्तांसाठी महत्त्वाची शिकवण देताना स्वामी दिसून येतील.
View this post on Instagram
‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत येत्या दत्तजयंतीला त्रिमूर्तींच्या साक्षीने आई भवानीने कद्दरासुराला दिलेल्या आव्हानाची न भूतो न भविष्यती अशी रोमांचक गोष्ट प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. कद्दरासुराने त्याच्या गुरूच्या सांगण्यावरुन त्रिलोकाचा स्वामी होण्यासाठी भवानीरुपातल्या आदिशक्तीच्या शक्तींना वश करण्याचा केलेला प्रयत्न आणि त्यातून उभे राहणारे महानाट्य, त्यात ब्रम्हा – विष्णु – महेश या त्रिदेवांनी त्रिमूर्तीं स्वरूपात प्रकट होणे असा एक अत्यंत अद्भुत चमत्कार आणि दैवी लीलांचा समावेश असलेला श्री दत्त जयंती विशेष महाएपिसोड प्रेक्षकांना पाहता येईल. या विशेष भागात ‘आई तुळजाभवानी’चे आगळेवेगळे रूप पाहण्याची तसेच त्रिमूर्ती प्रकट होण्याचे कारण जाणून घेण्याची प्रेक्षकांना विशेष उत्सुकता आहे.
‘इंद्रायणी’ मालिकेच्या महाएपिसोडमध्ये गावावरचं भूताचं संकट इंदू आणि फंट्या गँग मिळून अत्यंत नाट्यमय पद्धतीने सर्वांसमोर आणणार आहेत. गावार आलेलं अंधश्रद्धेचं मोठं वादळ दूर केल्याने सर्वत्र इंदूचं कौतुक होणार आहे. दरम्यान गावकरी इंदूला कीर्तन करण्याचा आग्रह करणार आहेत. इंदूने सत्याची साथ कधी सोडली नाही आणि गावावरचं जे संकट होतं ते दूर केल्याने व्यंकू महाराजदेखील इंदूलाच कीर्तन करायला भाग पाडणार आहेत. त्यामुळे व्यंकू महाराजांच्या उपस्थित इंदू पहिल्यांदाच एकटी दत्तजयंती विशेष कीर्तन करताना दिसून येणार आहे.