तुनिशानंतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची आत्महत्या; अवघ्या 22 व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

| Updated on: Dec 28, 2022 | 11:23 AM

22 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा संशयास्पद मृत्यू; गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

तुनिशानंतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची आत्महत्या; अवघ्या 22 व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर लीना नागवंशी
Image Credit source: Instagram
Follow us on

छत्तीसगड: 20 वर्षीय अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येनं सर्वांनाच मोठा धक्का बसला. ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या मालिकेच्या सेटवर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तुनिशानंतर आता एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने वयाच्या 22 व्या वर्षी टोकाचं पाऊल उचललं आहे. छत्तीसगडमधली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर लीना नागवंशी हिचा मृतदेह तिच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

युट्यूबर लीना नागवंशीने छत्तीसगढमधील रायगड इथल्या तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासानुसार, पोलिसांनी लीनाने आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे. लीनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

लीनाचे इन्स्टाग्रामवर 10 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ‘रॉयल लीना’ या नावाने तिचं युट्यूब चॅनल होतं. त्यावर ती विविध व्हिडीओ पोस्ट करायची. सोशल मीडियावर लीनाची शेवटची पोस्ट ही तीन दिवसांपूर्वीच आहे. ख्रिसमसनिमित्त तिने दोन रिल्स पोस्ट केल्या होत्या.

लीनाने काही म्युझिक व्हिडीओ आणि शॉर्ट फिल्ममध्येही काम केलं होतं. तिच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या फोटोशूटचे बरेच फोटो पहायला मिळतात. सोशल मीडियावर इतकी सक्रीय असणाऱ्या लीनाने टोकाचं पाऊल का उचललं, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लीनाच्या घरातून पोलिसांनी कुठलीच सुसाईड नोट सापडली नाही. पोलिसांनी लीनाचा फोन ताब्यात घेतला आहे.

लीना नैराश्यात होती का, याचाही तपास पोलीस करत आहे. या घटनेनंतर तिच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे. लीनाने आत्महत्या का केली, याचं कारण त्यांनाही अद्याप स्पष्ट नाही.