मुंबई : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री डेबिना बॅनर्जीने काही महिन्यांपूर्वी दुसऱ्या मुलीला जन्म दिला. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर लगेचच गरोदर झाल्याने तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत डेबिना तिच्या प्रेग्नंसीविषयी, त्यातील अडचणींविषयी आणि आयव्हीएफविषयी (IVF) मोकळेपणे व्यक्त झाली. डेबिनाने 2011 मध्ये अभिनेता गुरमीत चौधरीशी लग्न केलं. मात्र लग्नानंतर डेबिनाला गरोदरपणात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. अखेर एप्रिल 2022 मध्ये तिने IVF द्वारे (इन विट्रो फर्टिलायजेशन) मुलीला जन्म दिला. त्यानंतर दुसऱ्यांदा ती नैसर्गिक पद्धतीने गरोदर झाली.
डॉक्टरांनी डेबिनाला आधी IUI (इन्ट्रॉटराइन इन्सेमिनेशन) प्रक्रियेद्वारे गरोदर होण्याचा सल्ला दिला होता. ही फार क्लिष्ट प्रक्रिया नाही. ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “यात महिन्याच्या ठराविक दिवसांमध्ये डॉक्टर काही इंजेक्शन्स देतात. पतीच्या वीर्याचाही अभ्यास केला जातो. पण ही प्रक्रिया माझ्या कामी आली नव्हती. मी पाच वेळा IUI ट्रिटमेंट घेतली आणि पाचही वेळा त्यात मला अपयश आलं.”
“IUI ट्रिटमेंटनंतर सर्वोत्तम पर्याय हा IVF चा होता. त्यात भ्रूण (Embryo) ट्रान्सफरची किंमत 30 हजार रुपये होती. ही किंमत प्रत्येक हॉस्पिटलनुसार वेगळी असू शकते. IVF द्वारे माझी गर्भधारणा झाली. सुरुवातीला मी घाबरले होते पण आता मला काहीच भीती वाटत नाही. जेव्हा लोक विचारतात की IVF ट्रान्सफरचा पर्याय का अवंलबला, तेव्हा मी सांगते की जर एखादी गोष्ट बराच काळ प्रयत्न करूनसुद्धा होत नसेल तर मी माझा आणखी वेळ वाया घालवू शकत नव्हती. गर्भधारणा का होत नाही याचा विचार करत मी बसू शकले नसते. त्यापेक्षा मी प्रयत्न करण्याला प्राधान्य दिलं आणि पाच वर्षांनंतर मला मुलगी झाली”, असं तिने पुढे सांगितलं.
पहिल्या मुलीच्या प्रसूतीनंतर चार महिन्यांनी डेबिनाने दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. 11 नोव्हेंबर 2022 रोजी डेबिनाने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. डेबिना आणि गुरमीतच्या पहिल्या मुलीचं नाव लियाना तर दुसऱ्या मुलीचं नाव दिविशा असं आहे. डेबिनाची दुसरी गर्भधारणा ही नैसर्गिक पद्धतीने झाली असली तरी दिविशाचा जन्म डिलिव्हरीच्या तारखेआधी झाला होता. त्यामुळे तिला रुग्णालयात काही दिवस दाखल करण्यात आलं होतं.