Deepika Padukone : लग्नातील फसवणुकीबद्दल दीपिका पादुकोण स्पष्टच बोलली; म्हणाली “आमचेही वाईट दिवस..”
'कॉफी विथ करण 8' या सिझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. या दोघांच्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत. या चॅट शोमध्ये दीपिका लग्नातील फसवणुकीबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली.
मुंबई : 26 ऑक्टोबर 2023 | करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण 8’ या लोकप्रिय चॅट शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण ही जोडी प्रमुख पाहुणे म्हणून हजर झाले. या एपिसोडमध्ये दोघं रिलेशनशिप, लग्न, नात्यातील फसवणूक या विषयांवर मोकळेपणे व्यक्त झाले. फिल्म इंडस्ट्रीमध्ये सतत आजूबाजूला आकर्षक लोकं असताना भावनिक आणि सेक्शुअली आपल्या जोडीदाराबद्दल निष्ठावान राहणं किती कठीण असतं, तो मोह आवरणं किती अवघड असतं, असा सवाल करण जोहरने दीपिका आणि रणवीरला केला. त्यावर दीपिका म्हणाली, “माझ्या मते लग्न हे एक काम आहे. मग तुम्ही या इंडस्ट्रीत काम करत असा किंवा इतर कुठेही. लग्न हे काम आहे आणि दररोज त्यासाठी काम केलं पाहिजे.”
याविषयी आपला मुद्दा स्पष्ट करताना दीपिका पुढे म्हणाली, “लग्न जरी म्हटलं तरी त्याचं स्वतंत्र आयुष्य आहे. तो एका वेगळ्या वातावरणात लहानाचा मोठा झाला आहे. माझं आयुष्य वेगळं आहे आणि माझीही जडणघडण वेगळ्या वातावरणात झाली. दोन भिन्न व्यक्ती एकत्र आले आहेत. मी असं म्हणणार नाही की आम्ही भांडत नाही किंवा आमच्यात वाद होत नाहीत. आमचेही काही वाईट दिवस असतात. पण आम्ही त्यातून एकत्रितरित्या मार्ग काढतो आणि काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो. आम्ही एकमेकांशी संवाद साधतो आणि त्या घटनेतून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. या प्रयत्नांमुळेच लग्न सुंदर होतं.”
View this post on Instagram
सर्वसामान्य विवाहित जोडप्यांप्रमाणेच आमच्याही संसारत कठीण काळ आल्याची कबुली दीपिकाने यावेळी दिली. “जर एखाद्याला असं वाटत असेल की लग्न म्हणजे रोज सकाळी उठून कोणीतरी तुम्हाला तुमचा कॉफी बनवून देतोय किंवा दररोजची पहाट सुंदर होतेय, तर हे साफ खोटं आहे. अर्थात काही दिवस असेही असतात. पण लग्न म्हणजे काम आहे आणि कामच लग्नाला सुंदर बनवतं”, असं मत तिने मांडलं. दीपिका आणि रणवीरने 2018 मध्ये इटलीतील लेक कोमो याठिकाणी लग्नगाठ बांधली. मात्र त्यापूर्वी 2015 मध्ये गुपचूप साखरपुडा उरकल्याचा खुलासा रणवीरने ‘कॉफी विथ करण 8’मध्ये केला.