Pathaan: ‘पठाण’मधील दीपिकाच्या भगव्या बिकिनीबाबत महत्त्वपूर्ण अपडेट; वादानंतर सेन्सॉर बोर्डाने..
'पठाण'मधील दीपिकाचा भगव्या बिकिनीचा लूक बदलणार? सेन्सॉर बोर्डाने नेमकं काय ठरवलं, माहिती आली समोर
मुंबई: अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘पठाण’ हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील पहिलं गाणं ‘बेशरम रंग’ जेव्हा प्रदर्शित झालं, तेव्हा खूप मोठा वाद झाला. या गाण्यातील एका दृश्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली. यावरूनच हा वाद सुरू झाला. भगव्या बिकिनीवर हिंदू संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर सेन्सॉर बोर्ड यावर कात्री चालवणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्याविषयी आता महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे.
सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील 10 दृश्यांवर कात्री चालवली आहे. यात ‘बेशर्म रंग’ गाण्यातील काही दृश्यांचा समावेश आहे. त्याचसोबत काही डायलॉग्स बदलण्यास सांगितले आहेत. मात्र ‘बेशर्म रंग’ या गाण्यातील ज्या दृश्यावरून एवढा मोठा वाद झाला, ते दृश्य अद्याप चित्रपटात तसंच राहणार आहे. भगव्या बिकिनीबाबत सेन्सॉर बोर्डाने कोणताच कट सुचवला नसल्याचं कळतंय.
सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात सुचवलेले काही बदल
- RAW (रॉ) हा शब्द बदलून त्याऐवजी हमारे असा शब्द वापरावा
- लंगडे लुले हा शब्द बदलून टुटे-फुटे वापरावा
- PM (पीएम) ऐवजी प्रेसिडेंट किंवा मिनिस्टर
- अशोकचक्रऐवजी वीर पुरस्कार
- एक्स केजीबी- एक्स एसबीयू
- मिसेस भारतमाता- हमारी भारतमाता
- स्कॉच- ड्रिंक
- ब्लॅक प्रिझन, रशिया- ब्लॅक प्रिझन
‘बेशर्म रंग’ गाण्यातील बदल-
‘बेशर्म रंग’ या गाण्यातील दीपिकाचे अंगप्रदर्शन करणारे काही सीन्स बदलण्यास सांगण्यात आले आहेत. साईड पोझचे शॉट्स (पार्शिअल न्युडिटी), ‘बहुत तंग किया’ हे बोल सुरु असताना दीपिकाचा डान्स बदलण्यात येणार आहे.
पठाण या चित्रपटातील PMO हा शब्द 13 जागांवरून काढून टाकण्यात आला आहे, असंही समजतंय. पठाण हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका आहेत.