Deepika-Ranveer : लग्नाच्या 5 वर्षांनंतर समोर आला दीपिका-रणवीरच्या लग्नाचा व्हिडीओ
अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाचा व्हिडीओ अखेर समोर आला आहे. 'कॉफी विथ करण 8' या शोमध्ये दोघांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ पहिल्यांदाच दाखवण्यात आला आहे. या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
मुंबई : 26 ऑक्टोबर 2023 | करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण 8’ या लोकप्रिय चॅट शो नुकताच सुरू झाला आहे. या सिझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. या दोघांच्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत. इटलीतील लेक कोमो याठिकाणी अत्यंत शाही लग्नसोहळा पार पडला होता. त्याचे फोटो चाहत्यांना सोशल मीडियावर पहायला मिळाले होते. मात्र पाच वर्षांनंतर आता रणवीर-दीपिकाच्या लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे. ‘कॉफी विथ करण 8’मध्ये या दोघांनी लग्नाचा व्हिडीओ दाखवला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
या व्हिडीओची सुरुवात साखरपुड्याच्या पार्टीने होते. रणवीर दीपिकासमोर त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली देतो. त्यानंतर दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोण म्हणतात की, रणवीर त्यांच्या बोरिंग फॅमिलीमध्ये उत्साह घेऊन आला आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर-दीपिकाच्या लग्नातील सर्व फंक्शन्सची झलक दाखवण्यात आली आहे. मेहंदीच्या कार्यक्रमात रणवीर दीपिकाची काळजी घेताना दिसत आहे. त्यानंतर रणवीरचा जबरदस्त डान्ससुद्धा या व्हिडीओत पहायला मिळतो. रणवीर आणि दीपिकाचं लग्न दोन्ही पद्धतीने झालं होतं. या दोन्ही पद्धतींच्या विधींची झलकसुद्धा त्यात पहायला मिळतेय.
View this post on Instagram
आनंद कारजच्या आधी रणवीरला दीपिकाची भेट घ्यायची होती. आपलं प्रेम व्यक्त करायचं होतं. हेसुद्धा या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे. इटलीतील लग्नसोहळ्याला मोजक्याच पाहुण्यांची उपस्थिती होती. त्यानंतर दीपिका – रणवीरने बेंगळुरू आणि मुंबईत रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. या रिसेप्शन पार्टीला बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
कॉफी विथ करणमध्ये या दोघांनी त्यांच्या साखरपुड्याबद्दलही खुलासा केला. 2015 मध्ये तुम्ही दोघांनी साखरपुडा केला होता का, असा प्रश्न करणने विचारला होता. त्यावर रणवीर म्हणाला, “मी तिला 2015 मध्येच प्रपोज केलं होतं. दुसरी एखादी व्यक्ती तिच्या आयुष्यात येण्याआधीच मी विचार केला की आपणच आधी बुकिंग केलेली बरी.” हे ऐकल्यानंतर दीपिका म्हणते “अॅडव्हान्स बुकिंग”. त्यानंतर करण आणि रणवीरसुद्धा हसू लागतात. या प्रोमो व्हिडीओमध्ये दीपिकाला करणने असाही प्रश्न विचारला की, “तू रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात रणवीरने साकारलेल्या रॉकी रंधावाच्या भूमिकेसारख्या व्यक्तीला डेट करशील का?” त्यावर दीपिका मजेशीरपणे म्हणते, “मी रॉकी रंधावाशीच लग्न केलं आहे.”