मुंबई : बॉलीवूडची अग्रेसर अभिनेत्री दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) पुन्हा एकदा आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ सर्वांसमोर मांडला आहे. तो कठीण काळ म्हणजे डिप्रेशनचा (Depression) काळ. दीपिका ही मेंटल हेल्थ NGO द लीव्ह लव्ह लाफ फाऊंडेशनची फाऊंडर आहे. दीपिकाने सांगितलं की माझ्या आईनेच माझ्यातील डिप्रेशनची लक्षणं ओळखली आणि माझी मदत केली. दीपिका मुंबईतील (Mumbai) एका कार्यक्रमात बोलत होती. दीपिका म्हणाली की, ‘मी माझ्या आईला सर्व श्रेय देईल की तीने माझ्यातील लक्षणं ओळखली. सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. मी माझ्या करिअरच्या उंचीवर होते. त्यामुळे मी त्यावेळी काय अनुभवलं आणि कशामुळे अनुभवलं याचं स्पष्ट कारण मला सांगता येत नाही’.
ते असे दिवस होते की मला उठावसंही वाटत नव्हतं. मी झोपू इच्छित होते कारण झोपणं हीच माझ्यासाठी त्यावेळी पळवाट होती. मी त्यावेळी आत्मघाती होते आणि त्याचा सामना मला करावा लागला. जेव्हा माझे पालक माझ्यापुढे येतील तेव्हा मी मजबूत असल्याचं मी त्यांना दाखवत होते. ते जेव्हा जेव्हा माझ्यासमोर येतील तेव्हा मी ठीक आहे असंच मी त्यांना दाखवत असायचे. तुम्हीही तुमच्या आई-वडिलांना तुम्ही चांगले आणि आनंदी आहात असंच दाखवाल ना, असंही दीपिका यावेळी म्हणाली.
दीपिकाच्या आईने तिची ही अवस्था कशी ओळखली, याबाबत दिपीकाने सांगितलं की, मी त्यांना सातत्याने सर्वकाही ठीक असल्याचं दाखवत होते. मात्र एकदा ते बंगळुरूला परत जाताना मी स्वत:ला रोखू शकले नाही, मी रडायला लागले. माझ्या आईने मला सामान्य प्रश्न विचारले, बॉयफ्रेन्ड आहे का? कामाच्या ठिकाणी कुणी आहे का? काय झालं? मात्र, माझ्याकडे कुठल्याही प्रश्नाची उत्तरं नव्हती. यातील काहीही नव्हतं. हे खरं तर एका रिकाम्या, अस्वस्थ डोक्यातून आलं होतं. आईने माझी स्थिती ओळखली, जणू तिला माझ्यासाठी देवानेच पाठवलं होतं, अशा शब्दात दीपिकाने आपली तेव्हाची अवस्था शब्दात मांडली.