मुंबई: अभिनेत्री दिप्ती नवल यांची गणना बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्रींमध्ये होते. आपल्या साध्यासरळ स्वभावाने आणि सहज अभिनयाने त्यांनी चाहत्यांची मनं जिंकली आहेत. बॉलिवूडसोबतच त्यांनी काही परदेशी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक प्रकाश झा यांच्याशी त्यांनी लग्न केलं होतं. दिप्ती यांच्या वैयक्तिक आयुष्यात बरेच चढउतार आले, मात्र त्याचा प्रकाश झा यांच्यासोबतच्या नात्यावर कधीच परिणाम झाला नाही. लग्नाआधीही दोघं चांगले मित्र होते, लग्न होतानाही आणि लग्नानंतरही त्यांच्यातील मैत्री कायम राहिली.
दिप्ती नवल यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1952 रोजी पंजाबच्या अमृतसरमध्ये झाला. 1978 मध्ये त्यांचा पहिला चित्रपट ‘जुनून’ प्रदर्शित झाला. यामध्ये त्यांनी शशी कपूर यांच्यासोबत भूमिका साकारली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन श्याम बेनेगल यांनी केलं होतं. दिप्ती यांनी त्यांच्या करिअरमध्ये फारुख शेख यांच्यासोबत एकापेक्षा एक दमदार चित्रपट केले होते. या दोघांमध्ये चांगली मैत्रीसुद्धा होती. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत्या, मात्र त्यात काही तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं.
दिप्ती यांनी 1985 मध्ये प्रकाश झा यांच्याशी लग्न केलं. या दोघांचा संसार 17 वर्षांपर्यंत चालला. मात्र बराच वेळ दोघं वेगवेगळेच राहिले. 2002 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. प्रकाश यांच्यासोबतच्या नात्याबद्दल बोलताना दिप्ती एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या, “प्रकाश जी आणि माझ्यात काही मोठं भांडण झालं नव्हतं. आमच्यात कटुताही नव्हती. पण ठराविक काळानंतर आमच्या लक्षात आलं होतं की आमचे मार्ग आता वेगळे झाले आहेत. मी सुद्धा माझ्या अभिनय कारकिर्दीत व्यग्र होते. कदाचित नात्याला अधिक वेळ दिला असता तर आज गोष्ट वेगळी असती.”
दिप्ती नवल आणि प्रकाश झा यांनी लग्नानंतर एका मुलीला दत्तक घेतलं होतं. त्या मुलीचं नाव त्यांनी दिशा असं ठेवलं आहे. ज्यावेळी दोघांचा घटस्फोट झाला तेव्हा त्या पंडित जसराज यांचा भाचा विजय पंडितसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. घटस्फोटाच्या दिवशी प्रकाश आणि दिप्ती यांनी मुलगी दिशासोबत डिनर पार्टी केली होती. या पार्टीत विजय पंडितसुद्धा सहभागी झाले होते.