दिल्ली: दिल्लीत 17 वर्षीय मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याच्या घटनेनं अभिनेत्री कंगना रनौतला तिच्या बहिणीसोबत घडलेल्या धक्कादायक घटनेची आठवण करून दिली. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट लिहित त्या मानसिक धक्क्याचा उल्लेख केला. बाजूने चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीविषयी मनात भिती बसली होती, असं तिने लिहिलंय.
‘मी किशोरवयीन असताना माझी बहीण रंगोली चांडेल हिच्यावर एका रोडसाइड रोमियोने ॲसिड हल्ला केला होता. तिच्यावर 52 सर्जरी करण्यात आले होते. आपण कल्पनाही करू शकणार नाही इतका शारीरिक आणि मानसिक धक्का तिला बसला होता. एक कुटुंब म्हणून आम्ही पूर्णपणे खचलो होतो,’ असं तिने लिहिलं.
बहिणीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याचा परिणाम कंगनावरही झाला होता. ‘मलाही थेरपी घ्यावी लागली, कारण माझ्यावरही ॲसिड हल्ला होईल की काय अशी भीती मला वाटत होती. जेव्हा कधी एखादा बाईकस्वार, कार किंवा अनोळखी व्यक्ती बाजूने जायची तेव्हा भीतीने मी माझा चेहरा लपवायची. हे अत्याचार थांबलेच नाहीत. अशा गुन्ह्यांविरोधात सरकारने कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. मी गौतम गंभीर यांच्याशी सहमत आहे. ॲसिड हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई करायला हवी’, असं तिने म्हटलंय.
क्रिकेटर आणि खासदार गौतम गंभीरने ॲसिड हल्ल्यातील दोषींना सार्वजनिकरित्या फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी केली. ‘गुन्हेगारांच्या मनात भिती निर्माण केली पाहिजे. फक्त शब्दांनी न्याय मिळणार नाही. अशा जनावरांच्या मनात खोलवर भिती बसली पाहिजे,’ असं त्यांनी म्हटलंय.
दिल्ली ॲसिड हल्ल्याच्या घटनेत पीडितेचा आठ टक्के चेहरा भाजला. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.