नवी दिल्ली | 19 ऑक्टोबर 2023 : टेलिव्हिजनवरील सर्वांत मोठा रिॲलिटी शो ‘बिग बॉस’ संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल जाहीर केला आहे. बिग बॉसचा सतरावा सिझन सध्या टेलिव्हिजनवर सुरू आहे. या सिझनच्या अनधिकृत स्ट्रीमिंगवर दिल्ली हायकोर्टाने निर्बंध घातले आहेत. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, बेकायदेशीरपणे बिग बॉसचा कंटेट प्रसारित करणाऱ्या वेबसाइट्समुळे पायरसीला चालना मिळेल आणि त्यात वाहिनीचं मोठं नुकसान होईल, असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. टेलिव्हिजनशिवाय वेगवेगळ्या अनधिकृत वेबसाइट्सवर बिग बॉसच्या आगामी किंवा जुन्या एपिसोड्सचं प्रसारण दाखवलं जायचं. त्यामुळे शोच्या निर्मात्यांना तोटा सहन करावा लागत होता. याविरोधात ‘वायकॉम 18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेड’कडून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
बिग बॉस हा शो कलर्स टीव्हीवर प्रसारित केला जातो. हे चॅनल वायकॉम 18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची आहे. फिर्यादीने कोर्टात सांगितलं, “आमचा शो हिंदीसह वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये टेलिव्हिजन चॅनल्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवला जातो. मात्र अनेक वेबसाइट्स ‘बिग बॉस’ हे नाव वापरून अनधिकृतरित्या त्याचं प्रसारण करत आहेत. ज्यामुळे आम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय.” त्यावर सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटलं, “या शोचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्याचे जुने किंवा नवीन सिझन बेकायदेशीरपणे इतर वेबसाइट्सवर प्रसारित केल्याने कॉपीराइट्सच्या अधिकाराचं उल्लंघन होतं.” बिग बॉसच्या या शोच्या कोणत्याही जुन्या किंवा नव्या एपिसोडचं प्रसारण, पुनर्प्रसारण, होस्टिंग हे दुसऱ्या कोणत्याही वेबसाइट्सवरून करणं प्रतिबंधित आहे, असं न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं.
कोर्टाने असंही सांगितलं की जियो सिनेमासारखे ओटीटी प्लॅटफॉर्म हे सबस्क्रिप्शनवर आधारित असल्याने जर अनधिकृत वेबसाइट्सवर शोचा कंटेट टेलिकास्ट होत असेल तर ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी ते नुकसानकारक आहे. त्यामुळे बिग बॉसच्या कोणत्याही एपिसोड्सचं प्रसारण करणं, टेलिकास्ट करणं, स्ट्रीम करणं, रिट्रान्समिटींग करणं आणि होस्टिंग करणं इतर वेबसाइट्सना महागात पडणार आहे. इतकंच नव्हे तर ‘बिग बॉस’ या नावाची दुसरी कोणती वेबसाइट आणि इतर कोणत्याही नावाने असलेली वेबसाइट असं काही करताना दिसली तर त्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.