माझा पती मुस्लीम आहे पण..; अरमान मलिकच्या पत्नीला अभिनेत्रीने सुनावलं
युट्यूबर अरमान मलिक त्याच्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉसच्या घरात दाखल झाला होता. त्यावरून अनेकांनी टीका केली होता. टीकाकारांमध्ये टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीचाही समावेश होता. त्यानंतर पायल मलिकने देवोलीनावर आंतरधर्मीय लग्नावरून टीका केली.
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी आणि युट्यूबर अरमान मलिकची पत्नी पायल मलिक यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक वाद सुरू आहे. अरमान त्याच्या दोन्ही पत्नींसोबत ‘बिग बॉस ओटीटी 3’मध्ये सहभागी झाला. यावरून देवोलीनाने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. तेव्हापासूनच पायल आणि तिच्यात वादाला सुरुवात झाली. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर पायलने देवोलीनाच्या आंतरधर्मीय लग्नावरून टिप्पणी केली. त्याचं उत्तर आता देवोलीनाने तिच्या एका पोस्टद्वारे दिलं आहे.
तिने लिहिलं, ‘दुसऱ्या धर्मात लग्न आणि एकापेक्षा अधिक लग्न या दोन गोष्टींची तुलना करण्यासाठी एका व्यक्तीमध्ये उच्च स्तराच्या ज्ञानाची गरज असते. ज्याबद्दल मला खात्री आहे की बुद्धिमान लोक याविषयी फार जागरूक आहेत. हा फक्त माझाच नाही तर प्रत्येक भारतीय नागरिकाचा अधिकार आहे की त्याने बहुपत्नीत्वसारख्या बेकायदेशीर गोष्टीविरोधात उभं राहावं. ही गोष्ट नॅशनल टीव्हीवर दाखवल्याबद्दल त्यांना फार गर्व वाटतोय. त्या बिचाऱ्या महिलांच्या आयुष्याची खिल्ली उडवू नका, ज्या अशा कारणामुळे दररोजचं मरण अनुभवतायत.’
‘असो, ज्याला जे वाटतं त्याने ते करावं, मात्र स्वत:च्या घरात. दोनच कशाला चार किंवा पाच लग्न करा. पण या आजाराला समाजात पसरवू नका. मी या गोष्टीविरोधात नेहमीच उभी राहीन. आणि हो, जरी माझा पती मुस्लीम असला तरी तो त्याच्या एका पत्नीसोबत प्रामाणकि आहे. त्याला बहुपत्नीत्वमध्ये काडीचा रस नाही. ही गोष्ट समजून घेण्यासाठी आम्ही चार वर्षांचा वेळ घेतला आणि त्यानंतर लग्न केलं. फक्त सात दिवसांत लग्न करण्याचा निर्णय घेतला नव्हता. एका महिलेच्या आत्मसन्मानाशी तडजोड नाही केली पाहिजे. पण मला माहितीये की तुला हे सर्व समजणार नाही. मला खरंच तुझी कीव वाटते. पण नंतर मला हे सर्व पाहून असं वाटतं की तुलाच हे सर्व पाहिजे होतं. तुमच्यासाठी हे सर्व युट्यूब कंटेट असू शकतं. पण माझ्यासाठी नाही. त्यामुळे तुमचं चालू द्या, माझं झालंय’, अशा शब्दांत देवोलीनाने पायलला सुनावलं.
देवोलीना भट्टाचार्जीने 14 डिसेंबर 2022 रोजी जिम ट्रेनर शाहनवाज शेखशी लग्न केलं. आंतरधर्मीय लग्नामुळे देवोलीनाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. “मला आणि माझ्या पतीला सोडा, आम्ही आमचं बघून घेऊ. दुसऱ्यांच्या धर्माविषयी गुगल सर्च करण्याआधी तुम्ही तुमच्या धर्मावर लक्ष केंद्रीत करा आणि चांगली व्यक्ती बना. एवढं तर मला नक्कीच माहीत आहे की तुमच्यासारख्या लोकांकडून ज्ञान घेण्याची मला अजिबात गरज नाही,” असं उत्तर तिने त्यावेळी ट्रोलर्सना दिलं होतं.