‘धर्मवीर 2’ची प्रतीक्षा संपली; अखेर ‘या’ दिवशी जगभरात प्रदर्शित होणार चित्रपट
येत्या 9 ऑगस्ट रोजी ‘धर्मवीर’ या चित्रपटाचा दुसरा भाग ‘धर्मवीर 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र राज्यातील पूरजन्य परिस्थिती पाहता निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती. आता हा चित्रपट थिएटरमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षकांना फक्त दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. काही गावं पाण्याखाली गेली तर काही गावांचा संपर्कही तुटला होता. राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहून ‘धर्मवीर 2’ या ९ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय हा चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई आणि उमेश कुमार बन्सल यांनी घेतला होता. या अनोख्या निर्णयाचं सगळीकडे विशेष कौतुकही करण्यात आलं होतं. सध्याची परिस्थिती ही नियंत्रणात असल्याने अखेर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. अजून दीड महिन्याचा अवधी घेऊन हा चित्रपट येत्या 27 सप्टेंबरला जगभरात प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
‘धर्मवीर 2’ या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. प्रदर्शनाची तारीख पुढे गेल्यावर चित्रपटगृहांकडून विचारणा होत होती, अनेक ग्रुप बुकिंगसाठी थांबलेले होते, परदेशातून प्रदर्शनासाठी विचारणा होत होती, सोशल मीडियावरही चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याची विचारणा अनेकजण करत होते. आता प्रेक्षकांना चित्रपटासाठी केवळ 27 सप्टेंबर पर्यंत अजून थोडी वाट पहावी लागणार आहे. ‘धर्मवीर 2’ हा चित्रपट येत्या 27 सप्टेंबरला मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.
View this post on Instagram
‘धर्मवीर 2’च्या पोस्टरवर साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट असा उल्लेख करण्यात आला आहे. धर्मवीर चित्रपटात दिघे साहेबांचे जीवनचरित्र दाखवल्यानंतर आता ‘धर्मवीर 2’मध्ये हिंदुत्त्वाची गोष्ट कशी दाखवली जाणार असून याकडे आता अनेकांचं लक्ष लागलं आहे. काही दिवसांपूर्वीच या सीक्वेलचा टीझर प्रदर्शित झाला. प्रेक्षकांकडून या टीझरला दमदार प्रतिसाद मिळाला. प्रवीण तरडेंनीच ‘धर्मवीर 2’चं लेखन, दिग्दर्शन केलंय.
आनंद दिघे यांना मानणारा एक मोठा वर्ग आजही मोठ्या प्रमाणात ठाण्यात आहे. आपल्या लोककारणी नेत्याला ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर बघायला प्रेक्षक आतुर होते. ‘धर्मवीर’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट बघून अनेकजण भावूकही झाले आणि त्यांच्या आठवणी पुन्हा एकदा नव्याने जाग्या झाल्या. अभिनेता प्रसाद ओक याने साकारलेली धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका अतिशय उत्कृष्ट होती, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या. या चित्रपटाने अनेक पुरस्कारही प्राप्त केले आहेत.