Dharmaveer 2 Teaser : नुसता अंगावर काटा..; ‘धर्मवीर 2’च्या टीझरवर प्रतिक्रियांचा पाऊस
'धर्मवीर' चित्रपटाच्या यशात उत्तम स्टारकास्टसह लेखन, दिग्दर्शनही महत्त्वाचं ठरलं होतं. अनेक पुरस्कारही या चित्रपटला मिळाले होते. प्रवीण तरडेंनीच 'धर्मवीर 2'चं लेखन, दिग्दर्शन केलंय. आता या सीक्वेलच्या टीझरने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
क्रांती दिनाच्या औचित्याने प्रदर्शित होत असलेल्या ‘धर्मवीर 2’ या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. या टीझरने ‘ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की’ या दमदार संवादामुळे लक्ष वेधून घेतलं आहे. ‘धर्मवीर 2’ हा चित्रपट येत्या 9 ऑगस्ट रोजी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर आता त्याच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे.
या टीझरमध्ये एक मुस्लिम महिला राखी बांधायला दिघे साहेबांकडे येते. साहेब तिला बुरखा काढायला सांगतात. तिने चेहरा दाखवताच तिला मारहाण झाल्याचं साहेबांना कळतं आणि साहेब संतापतात. राखी बांधायला राज्यभरातून आलेल्या समस्त बहिणींना घेऊन साहेब निघतात. त्याचवेळी खास शैलीत साहेब म्हणतात, ‘ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की!’ अंगावर काटा आणणाऱ्या या टीझरमधून साहेबांच्या हिंदुत्त्वाची एक झलक पाहायला मिळते.
View this post on Instagram
‘धर्मवीर 2’ या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई, उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनीच निभावली असून कॅमेरामन म्हणून महेश लिमये यांनी काम पाहिलं आहे. काही दिवसांपूर्वीच ‘धर्मवीर 2’ चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं होतं . ‘धर्मवीर 2’च्या पोस्टरवर साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट असा उल्लेख करण्यात आला आहे. धर्मवीर चित्रपटात दिघे साहेबांचे जीवनचरित्र दाखवल्यानंतर आता ‘धर्मवीर 2’मध्ये हिंदुत्त्वाची गोष्ट कशी दाखवली जाणार असून याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे. या चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता आहे.
जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे लोककारणी म्हणजे आनंद दिघे. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. धर्मवीर आनंद दिघेंची दमदार व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीचा अभिनेता प्रसाद ओकने साकारली.