Dharmendra: ‘त्यांना दोष देऊ की माझं भाग्य…’, धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचं मोठं वक्तव्य
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. दोन पत्नी आणि सहा मुलं असा धर्मेंद्र यांचा कुटुंब आहे पण अद्यापही धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांनी हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुलींचा स्वीकार केला नाही... असं अनेकदा समोर आलं.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. 1980 मध्ये धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. पण जेव्हा धर्मेंद्र आणि हेमा यांनी लग्न केलं तेव्हा अभिनेते विवाहित होते. पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरा संसार थाटला. धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न झालं तेव्हा ते फक्त 19 वर्षांचे होते आणि सिनेविश्वात देखील त्यांनी पदार्पण केलं नव्हतं. 1954 मध्ये धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत झालं होतं.
प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना चार मुलं आहेत. सनी देओल, बॉबी देओल, विजेता देओल आणि अजीता देओल अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत. संसार थाटल्यानंतर धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण 26 वर्षी आनंदी वैवाहिक आयुष्य व्यतीत केल्यानंतर धर्मेंद्र यांच्या आयुष्यात हेमा मालिनी यांची एन्ट्री झाली.
हेमा मालिनी – धर्मेंद्र यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी सर्वत्र जोर धरला होता. 1980 मध्ये दोघांनी लग्न केलं. धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरा संसार थाटला. धर्मेंद्र यांनी दुसरा संसार थाटल्यानंतर प्रकाश कौर यांनी दुःख व्यक्त केलं होतं.




प्रकाश कौर म्हणाल्या होत्या, ‘धर्मेंद्र माझ्या आयुष्यातील पहिले आणि शेवटचे पुरुष आहेत. ते माझ्या मुलांचे वडील आहेत. मी त्यांच्यावर प्रचंड प्रेम करते. मी त्यांचा सन्मान देखील करते. जे झालं ते झालं मला नाही माहिती कोणाला दोष दोऊ. त्यांना की नियतीला…’
पुढे प्रकाश कौर म्हणाला, ‘ते माझ्यापासून वेगळे होऊ शकतात. पण मला माहिती आहे मला जेव्हा त्यांची गरज भासेल तेव्हा ते कायम माझ्यासोबत असतील… मी कधीच त्यांच्यावर अविश्वास दाखवला नाही…’ असं देखील प्रकाश कौर म्हणाल्या होत्या…
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लव्हस्टोरी
‘तुम हसीन मैं जवान’ सिनेमाच्या सेटवर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यामध्ये प्रेम बहरलं. जवळपास 10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 1980 साली दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर आजपर्यंत हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या मुख्य घरी गेलेल्या नाहीत. आजही हेमा मालिनी यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.