पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी मध्यरात्री मद्यप्राशन करून भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणासह तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी मुलगा हा अल्पवयीन असून त्याची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर शहरातील राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था आक्रमक झाल्या आहेत. आता पुणे पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. या घटनेबाबत विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध लेखक क्षितीज पटवर्धनने या घटनेनंतर सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे मार्मिक शब्दांत क्षितीजने यंत्रणेवर टीका केली आहे.
‘मुंबईत होर्डींग असो किंवा पुण्यात गाडी, या देशात गुन्हा दडवायला जेवढ्या तत्परतेने सिस्टीम एकत्र येते, तेवढी सोडवायला येत नाही हे खरं दुर्दैव आहे. आपण नाव, जागा बदलत श्रद्धांजलीच्या पोस्ट लिहायच्या फक्त!,’ असं त्याने लिहिलं आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत वादळी वाऱ्याने घाटकोपर इथं 140 बाय 140 चौरस फुटांचं महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं होतं. या दुर्घटनेत सोळा लोकांनी आपले प्राण गमावले होते.
पुण्यातील कल्याणीनगर भागातील अपघातानंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या मोटारचालकाला नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. मोटारचालक शहरातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असून तो अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी मुलाविरुद्ध अपघात तसंच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.
अनीश अवधिया आणि अश्विनी कोस्टा अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं आहेत. अनीशचा मित्र अकीब मुल्ला याने याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अकीब आणि त्याचे मित्र कल्याणीनगर परिसरातील बॉलर पबमध्ये गेले होते. मध्यरात्री अडीचच्या सुमारास ते कल्याणीनगर चौकातून निघाले असताना त्यावेळी एका भरधाव मोटारीने दुचाकीस्वार अनीशला धडक दिली. मोटारीची धडक एवढी जोरात होती की अनीश आणि दुचाकीवर त्याच्या मागे बसलेली अश्विनी उंच फेकले गेले. रस्त्यावर आपटल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.