Bruce Lee: जास्त पाणी प्यायल्याने झाला होता ब्रूस लीचा मृत्यू? 49 वर्षांनंतर रिसर्चमध्ये मोठा दावा
मार्शल आर्ट किंग ब्रूस लीच्या मृत्यूचं कोडं उलगडलं? कारण वाचून सर्वांनाच बसला आश्चर्याचा धक्का!
मुंबई: मार्शल आर्ट्सला जगभरात ओळख मिळवून देणारा हॉलिवूड अभिनेता ब्रूस ली याने 20 जुलै 1973 रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी तो फक्त 32 वर्षांचा होता. त्यावेळी जेव्हा डॉक्टरांनी ब्रूस लीच्या निधनाचं कारण सांगितलं, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पेनकिलर खाल्ल्याने ब्रूस लीच्या मेंदूला सूज आली होती आणि त्यामुळेच त्याचं निधन झालं, असं म्हटलं गेलं होतं. आता जवळपास 50 वर्षांनंतर वैज्ञानिकांच्या एका अभ्यासाचा अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये ब्रूस लीचं निधन पेनकिलरमुळे नाही तर जास्त पाणी प्यायल्यामुळे झाल्याचा दावा केला आहे.
वैज्ञानिकांच्या या नव्या अहवालात असा दावा केला आहे की ब्रूसचा मृत्यू अधिक पाणी प्यायल्याने झाला होता. या निधनाच्या कारणाला त्यांनी ‘हायपोनाट्रेमिया’ असं म्हटलंय. ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये रक्तातील सोडियमचं प्रमाण अत्यंत कमी होतं. शरीरातील पाण्याचं प्रमाण जेव्हा जास्त होतं, तेव्हा अशी स्थिती निर्माण होते. पाण्यात सोडियम सतत विरघळत जातं आणि त्यामुळे मेंदूच्या पेशींना सूज येते.
या रिसर्चमध्ये असंही म्हटलं गेलं आहे की ब्रूस ली अधिकाधिक द्रव्य पदार्थांचं सेवन करत होता, त्यामुळेच त्याला हायपोनाट्रेमियाचा धोका होता. अशा स्थितीत संबंधित व्यक्तीला तहान खूप लागते.
इतकंच नव्हे तर द्रव्य पदार्थांमध्ये गांजा किंवा अल्कोहोल मिसळून प्यायल्याने त्याची किडनी योग्य पद्धतीने काम करू शकत नव्हती, असाही अंदाज या अहवालात वर्तवला आहे. यामुळे किडनीची फिल्टर करण्याची क्षमता कमी झाली असावी असं त्यात म्हटलंय.
वैज्ञानिकांच्या मते, जेव्हा ब्रूस लीचं निधन झालं, तेव्हा त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे जे पाणी तो पित होता, त्याचं फिल्टर होऊ शकत नव्हतं. अशा स्थितीत त्याच्या शरीरात पाण्याचं प्रमाण वाढलं होतं. ब्रूस लीची पत्नी लिंडा ली कँडवेलने एकदा त्याच्या लिक्विड डाएटबद्दलची माहिती दिली होती.