महायुतीच्या विजयात ‘धर्मवीर 2’चा मोलाचा वाटा? चर्चांना उधाण
प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर 2’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आला. झी5 या ओटीटीवर एका आठवड्यात सर्वाधिक व्ह्यूज या चित्रपटाने मिळवले आहेत. सप्टेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीला पूरक वातावरण निर्मिती केल्याचं म्हटलं जातंय.
विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार कामगिरी केली. 288 पैकी तब्बल 235 जागा जिंकून महायुतीने मुसंडी मारली. यात एकट्या भाजपला तब्बल 132 जागांवर विजय मिळाला. तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षांनीही जोरदार मुसंडी मारत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांना हादरा दिला. यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्याचं म्हटलं जातंय. निवडणुकीच्या तोंडावर आणलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, प्रचार रंगात आला असताना भाजपने चर्चेत आणलेलं ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ हे मुद्दे याचा महायुतीला मोठा फायदा झाला. या महाविजयात ‘धर्मवीर 2’ या चित्रपटानं मोलाची भूमिका बजावल्याचंही म्हटलं जात आहे.
‘धर्मवीर 2’ या चित्रपटातून साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट उलगडण्यात आली होती. स्वर्गीय आनंद दिघे यांनी राजकारण आणि समाजकारणाचा सुंदर मेळ घातला होता. 2019 मध्ये शिवसेनेकडून भारतीय जनता पक्षासह युती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह सत्तास्थापन करण्यात आली. त्यामुळे हिंदुत्त्वाशी असलेल्या निष्ठेशी तडजोड करावी लागत होती. त्यामुळे हिंदुत्त्वासाठी एकनाथ शिंदे यांनी वेगळा मार्ग कसा निवडला याची गोष्ट चित्रपटातून दाखवण्यात आली. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळाला होता. सप्टेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीला पूरक वातावरण निर्मिती केल्याचं म्हटलं जात आहे. त्याचाच परिणाम महायुतीच्या महाविजयावर झाल्याचं बोललं जातंय.
View this post on Instagram
‘धर्मवीर 2’ या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई यांनी केली होती. प्रवीण तरडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं. प्रसाद ओक, क्षितीज दाते, मंगेश देसाई, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, आनंद इंगळे, अभिजित थिटे, समीर धर्माधिकारी, स्नेहल तरडे यांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये चित्रपट देशभरात प्रदर्शित करण्यात आला होता. त्याचप्रमाणे ओटीटीवरही या चित्रपटाला कमालीचा प्रतिसाद मिळाला असून आजही चित्रपट चांगलाच चर्चेत आहे.
महायुतीच्या विजयानंतर ‘धर्मवीर’ आणि ‘धर्मवीर 2’मध्ये मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओकने लिहिलेली पोस्टही चर्चेत आली आहे. ‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा. धर्मो रक्षति रक्षित: हिंदूऐक्य चिरायू होवो’, अशी पोस्ट त्याने लिहिली आहे.