मुंबई | 21 सप्टेंबर 2023 : सध्या देशभरात गणेशोत्सवाची धूम पहायला मिळतेय. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे. गणेश चतुर्थीनिमित्त सोशल मीडियावर अनेकांनी फोटो पोस्ट करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. अनुष्का शर्मापासून राजकुमार राव, सारा अली खान, सोनू सूद, तुषार कपूर, सलमान खान, शिल्पा शेट्टी या सेलिब्रिटींच्या घरात गणरायाचं आगमन झालं. प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खाननेही सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र या फोटोतील एका गोष्टीमुळे नेटकऱ्यांनी तिला जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली. या ट्रोलिंगवर आता फराहने उत्तर दिलं आहे.
फराह खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अभिनेता राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखा यांच्या घरातील एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिच्यासोबत अभिनेत्री हुमा कुरेशी आणि पत्रलेखा दिसत आहेत. या फोटोमध्ये फराहने निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा प्रिंटेड सूट परिधान केला असून त्यावर त्याच रंगाचे स्लीपर्स घातले आहेत. ‘खान, कुरेशी आणि रावकडून सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. राजकुमार राव इतका व्यस्त होता की त्याच्याशिवायच आम्ही हा फोटो काढला’, असं कॅप्शन देत फराहने हा फोटो पोस्ट केला आहे. मात्र या फोटोमध्ये फराहच्या पायातील स्लीपर पाहून नेटकरी चांगलेच भडकले.
फराहच्या या फोटोवर विविध कमेंट्स करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ‘पूजेच्या वेळी चप्पल कोण घालतं’, असा सवाल एकाने केला. तर ‘कृपया स्लीपर काढून वावर. गणेश पूजेदरम्यान पायात चप्पल घालू नये’, असं दुसऱ्याने म्हटलंय. नेटकऱ्यांकडून सतत होणाऱ्या टीकांनंतर अखेर फराहने त्यावर स्पष्टीकरण दिलं. ‘आम्ही घराबाहेर होतो पण सांगण्यासाठी धन्यवाद. तुमची नजर थेट चप्पलवर गेली. तुमचं डोकंच फार दूषित आणि नकारात्मक आहे’, असं तिने म्हटलंय. फराह खानच्या या स्पष्टीकरणानंतर काहींनी तिची बाजू घेतली. तुला ट्रोलर्सना उत्तर द्यायची गरज नाही, इथे ओव्हरस्मार्ट लोकं खूप असतात, असं काहींनी म्हटलंय.