दिलीप कुमार यांच्या बहिणीचं निधन; दीर्घ आजारानंतर घेतला या जगाचा अखेरचा निरोप
दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांची बहीण सईदा यांचं 24 सप्टेंबर रोजी निधन झालं. गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. सईदा या दिलीप कुमार यांच्या बहीण आणि मेहबूब खान यांच्या सून होत्या. 2018 मध्ये सईदा यांचे पती इकबाल खान यांनी या जगाचा निरोप घेतला होता.
मुंबई | 26 सप्टेंबर 2023 : बॉलिवूडचे ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखले जाणारे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं दोन वर्षांपूर्वी निधन झालं. वयाच्या 99 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आता त्यांची बहीण सईदा यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. 24 सप्टेंबर रोजी सईदा यांचं निधन झालं. त्यांचं लग्न इकबाल खान यांच्याशी झालं होतं. इकबाल खान हे ‘मदर इंडिया’ आणि ‘अंदाज’ यांसारख्या चित्रपटांचे प्रसिद्ध निर्माते मेहबूब खान यांचे पुत्र होते. मुंबईतल्या वांद्रे इथल्या मेहबूब स्टुडिओजचे ते ट्रस्टीसुद्धा होते. 1954 मध्ये त्यांच्या वडिलांनी या स्टुडिओची निर्मिती केली होती.
दीर्घ आजाराने निधन
सईचा यांचं निधन दीर्घ आजाराने झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीने दिली. गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. सईदा या त्यांच्या उदार स्वभावासाठी ओळखल्या जायच्या. लोकांची मदत करण्यासाठी त्या नेहमीच तत्पर असायच्या. सईदा यांचे पती इकबाल यांचं निधन 2018 मध्ये झालं होतं. त्यानंतर सईदा यांची देखभाल मुलगी इल्हाम आणि मुलगा साकिब करत होते. मुलगी इल्हाम ही लेखिका आहे तर साकिब हा चित्रपट निर्माता आहे. सईदा यांच्या निधनानंतर आज (26 सप्टेंबर) मेहबूब स्टुडिओमध्ये शोकसभा पार पडणार आहे. त्यांच्या निधनावर अद्याप सायरा बानू यांची प्रतिक्रिया समोर आली नाही.
दिलीप कुमार यांचे कुटुंबीय
दिलीप कुमार हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांपैकी एक होते. ते ट्रॅजेडी किंग या नावानेही ओळखले जायचे. सईदा यांच्याशिवाय दिलीप कुमार यांचे इतरही भाऊ-बहीण होते. दिलीप कुमार यांचे भाऊ नासिर खान हे ‘गंगा जमुना’ या चित्रपटात झळकले होते. नासिर यांचं निधन 1974 मध्ये झालं होतं. त्यांचा मुलगा अयुब खान हा इंडस्ट्रीत अभिनेता आहे.