दिलीप कुमार यांच्या बंगल्याच्या जागेवरील हाऊसिंग प्रोजेक्टमध्ये तगडी गुंतवणूक; तब्बल इतक्या कोटींना विकला कॉम्प्लेक्स
दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या पाली हिल इथल्या बंगल्याच्या जागी आलिशान गृहसंकुल उभारलं जाणार अशी घोषणा गेल्या वर्षी करण्यात आली होती. आता याच इमारतीत मोठी गुंतवणूक झाली आहे. यातील एक तीनमजली अपार्टमेंट तब्बल 155 कोटींना विकलं गेलंय.
दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या मुंबईतील पाली हिल परिसरातील बंगल्याच्या जागी आलिशान गृहसंकुल उभारलं जाणार असल्याची घोषणा 2023 मध्ये करण्यात आली होती. या प्रकल्पात आता तगडी गुंतवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे. ॲपको इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीने या सी-व्ह्यू बिल्डिंगमध्ये 155 कोटी रुपयांना ट्रिपलेक्स अपार्टमेंट खरेदी केलं आहे. Zapkey.com ने दिलेल्या वृत्तानुसार, इमारतीच्या नवव्या, दहाव्या आणि अकराव्या मजल्यावर 9527 चौरस फूट कार्पेट एरियावर हे अपार्टमेंट पसरलेलं आहे. त्याची किंमत तब्बल 155 कोटी रुपये इतकी आहे. या ट्रिपलेक्सची विक्री 1.62 लाख रुपये प्रति चौरस फूट दराने झाली. या परिसरातील प्रॉपर्टीमध्ये हा सर्वाधिक किंमतीचा करार आहे, असं म्हटलं जातंय. यासाठी 9.3 कोटी रुपये मुद्रांक शुल्क आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क देण्यात आले आहेत.
‘द लेजंड’ या नावाने आशर ग्रुपकडून हा पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात येत असून त्यात 4 आणि 5 BHK लक्झरी अपार्टमेंट्स आहेत. यामध्ये दिलीप कुमार यांना समर्पित 2000 चौरस फुटांचं संग्रहायलदेखील असेल. 2016 मध्ये दिलीप कुमार यांनी आशर ग्रुपसोबत विकास करार केला होता. गेल्या वर्षी विकासकाने घोषणा केली होती की ते इमारतीमध्ये 15 लक्झरी अपार्टमेंट बांधणार आहेत. हा प्रकल्प 2027 पर्यंत पूर्ण होईल आणि त्यातून 900 कोटी रुपयांचा महसूल मिळू शकेल.
दिलीप कुमार यांच्या पाली हिल इथल्या बंगल्यावरून काही कायदेशीर वादसुद्धा झाले होते. दिलीप कुमार यांच्या कुटुंबाने रिअल इस्टेट फर्मवर खोटी कायदेशीर कागदपत्रे बनवल्याचा आरोप केला होता. मालमत्ता ताब्यात घेण्याच्या उद्देशाने त्यांनी असं केल्याचा दावा दिलीप कुमार यांच्या कुटुंबाकडून करण्यात आला होता. त्यानंतर 2017 मध्ये दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानो यांनी स्पष्ट केलं की त्यांना बंगल्याची चावी परत मिळाली आहे. त्यामुळे हा वाद मिटला आहे.
दिलीप कुमार यांचं मूळ नाव मोहम्मद युसूफ खान असं होतं. हिंदी सिनेमासृष्टीचा पहिला सुपरस्टार किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतला पहिला खान अशीही त्यांची ओळख होती. सर्वोत्तम अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार दिलीप कुमार यांनाच मिळाला होता. इतकंच काय सर्वोत्तम अभिनेत्याचे सर्वाधिक आठ फिल्मफेअर पुरस्कारही त्यांच्याच नावावर आहेत.