“ही माझी आई आहे..”; दिलजीत दोसांझने 15 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदा दाखवला आईचा चेहरा
आईवडिलांविषयी तो पुढे म्हणाला, "मी माझ्या आईचा खूप आदर करतो. माझे वडीलसुद्धा खूप चांगले आहेत. पण त्यांनी कधीच मला काही विचारलं नाही. मी कोणत्या शाळेत शिकलो हेसुद्धा त्यांनी मला कधी विचारलं नाही. त्यामुळे त्यांच्यासोबतचं नातं हळूहळू दुरावत गेलं. फक्त त्यांच्याचसोबतचं नाही, तर सर्वांसोबतचं नातं दुरावत गेलं होतं."
दिलजीत दोसांझ हे नाव आता फक्त पंजाबी गाण्यांच्या चाहत्यांपुरतंच मर्यादित राहिलेलं नाही. टेलर स्विफ्ट, कोल्डप्ले, एड शिरीन, बीटीएस यांसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायक आणि बँड्सइतकीच लोकप्रियता दिलजितची आहे. अवघ्या काही मिनिटांत त्याच्या कॉन्सर्टची तिकिटं विकली जातात. मूळ पंजाबी गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या दिलजीतने बॉलिवूड चित्रपटांमधील अनेक हिट गाणी गायली आहेत. दिलजीतची गाणी अनेकांच्या तोंडपाठ असली तरी त्याच्या खासगी आयुष्याविषयी फारसं कोणाला माहीत नाही. आता 15 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच त्याने एका कॉन्सर्टमध्ये त्याच्या आई आणि बहिणीचा चेहरा दाखवला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
दिलजीत जरी जगभरात प्रसिद्ध असला तरी त्याचं कुटुंब नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहिलंय. इतकंच नव्हे तर स्वत: दिलजीतसुद्धा त्याच्या कुटुंबीयांविषयी फारसं मुलाखतींमध्ये बोलत नाही. आता युकेमधील मँचेस्टर इथल्या एका कॉन्सर्टमध्ये त्याने आई आणि बहिणीची ओळख संपूर्ण जगाला करून दिली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कॉन्सर्टमध्ये ‘हास हास’ हे गाणं गात असताना दिलजीत प्रेक्षकांमध्ये उभ्या असलेल्या एका महिलेच्या दिशेने जातो. त्या महिलेसमोर पोहोचल्यानंतर ‘दिल तेनू दे दित्ता मैं ता सोनेया, जान तेरे कदमा च रखी होईये’ या गाण्याच्या खास ओळी गातो. मी माझं हृदय तुला दिलंय आणि माझं जीवन तुझ्या चरणी समर्पित केलंय, असा या ओळींचा अर्थ आहे. त्यानंतर तो म्हणतो, “ही माझी आई आहे.” यावेळी दिलजीत अत्यंत प्रेमाने आईचं हात वर उचलतो आणि तिच्यासमोर मान झुकवतो. दिलजीतचं हे प्रेम पाहून त्याच्या आईच्या डोळ्यात अश्रू येतात. त्यानंतर बाजूलाच उभ्या असलेल्या बहिणीकडे इशारा करत तो चाहत्यांना सांगतो, “..आणि ही माझी बहीण आहे.”
View this post on Instagram
दिलजीत त्याच्या कुटुंबीयांविषयी फारसा कधी व्यक्त होत नसल्याने हा क्षण चाहत्यांसाठी खूप खास मानला जात आहे. पंधरा वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच दिलजीतने त्याच्या आईला आणि बहिणीला कॅमेरासमोर दाखवल्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. याआधी एका पॉडकास्ट मुलाखतीत दिलजीत त्याच्या कुटुंबीयांविषयी बोलताना म्हणाला होता, “मी 11 वर्षांचा असताना घर सोडून मामांसोबत राहायला गेलो होतो. माझं गाव सोडून मी लुधियानामध्ये राहायला गेलो होतो. मामांनी माझ्या आईवडिलांना म्हटलं की, याला माझ्यासोबत शहरात पाठवा. त्यावर आईवडीलसुद्धा म्हणाले की, घेऊन जा. त्यांनी मला विचारलंसुद्धा नव्हतं. मी छोट्याशा घरात एकटाच राहायचो. रोज फक्त शाळेत जाऊन घरी यायचो. तेव्हा घरात टीव्हीसुद्धा नव्हता. तेव्हापासून मी माझ्या कुटुंबीयांपासून दुरावलो गेलो होतो.”