सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणी भडकला दिलजित दोसांझ; म्हणाला “ही 100 टक्के सरकारची नालायकी”
सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणी दिलजित दोसांझने सरकारला ठरवलं दोषी; राजकारणाबद्दल म्हणाला..
मुंबई: पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणी प्रसिद्ध गायक दिलजित दोसांझने सरकारला दोष दिला आहे. गायक शुभदीप सिंग सिद्धू हा सिद्धू मूसेवाला म्हणून ओळखला जायचा. 29 मे रोजी त्याची पंजाबमधील मनसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिलजितने सिद्धूच्या हत्येवर भाष्य केलं आहे. “ही 100 टक्के सरकारची नालायकी आहे”, अशा शब्दांत त्याने टीका केली.
“एक कलाकार कोणाचंच वाईट करू शकत नाही, हे मी स्वत:च्या अनुभवातून बोलतोय. त्याचा कोणाशी वाद असेल, यावर माझा विश्वासच नाही. त्यामुळे कोणी एखाद्याचा जीव का घेऊ शकेल? ही अत्यंत दु:खद बाब आहे. त्याच्याबद्दल बोलणंही कठीण होतंय. तुमचा एकुलता एक मुलगा आहे आणि त्याचा जीव गेला तर कसं वाटेल. त्याचे आई-वडील कसं जगत असतील? त्यांच्या दु:खाची कल्पनाही आपण करू शकत नाही”, असं दिलजित म्हणाला.
सरकारला दोष देत दिलजित पुढे म्हणाला, “ही 100 टक्के सरकारची नालायकी आहे. हे राजकारण आहे आणि राजकारण खूप घाणेरडं आहे. देवाकडे आपण प्रार्थना करू शकतो की त्यांना न्याय मिळू दे आणि पुन्हा अशी घटना घडू नये. याआधीही कलाकारांचा जीव घेतला गेला. माझ्या मते 100 टक्के ही सरकारची चूक आहे.”
पंजाब पोलिसांनी ज्या 424 जणांची सुरक्षा तात्पुरती काढून घेतली होती, त्यात सिद्धूचाही समावेश होता. सुरक्षा काढून घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्याची हत्या करण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य सतींदरजीत सिंग उर्फ गोल्डी ब्रार याने सिद्धू मूसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली.