‘डिस्को डान्सर’ फेम दिग्दर्शकाच्या मुलीचं निधन; घरात पाय घसरून पडली अन्..
गेल्या वर्षी सुभाष बब्बर यांनी पत्नी तिलोत्तमाला गमावलं होतं. त्या फुफ्फुसाशी संबंधित आजाराने ग्रस्त होत्या. त्यावेळी सुभाष हे आर्थिक समस्यांचा सामना करत असल्याचं वृत्त समोर आलं होतं. यामुळे पत्नीच्या उपचारांमध्ये अडथळे येत होते. त्यावेळी श्वेताने फिल्म इंडस्ट्रीत मदत मागितली होती.
मुंबई | 24 जुलै 2023 : बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक सुभाष बब्बर यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या सुपरहिट ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. शनिवारी 22 जुलै रोजी त्यांची मुलगी श्वेता बब्बरने अखेरचा श्वास घेतला. श्वेतासुद्धा वडिलांप्रमाणेच फिल्म इंडस्ट्रीत काम करत होती. श्वेताच्या पार्थिवावर कधी आणि कुठे अंत्यसंस्कार पार पडतील, याबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही.
19 जुलै रोजी श्वेता तिच्या घरात पडली. यावेळी तिला जबर मार लागला. तिचा पाय लकवाग्रस्त झाला होता आणि पाठीच्या कणात क्लॉटिंग झाली होती. तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर शनिवारी श्वेताने अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते.
फिल्म जर्नलिस्ट इंद्रमोहन पन्नू यांनी सांगितलं की श्वेता नेहमीच तिच्या वडिलांची सपोर्ट सिस्टिम होती. तिने वडिलांना फिल्ममेकिंगमध्ये बरीच मदत केली होती. चित्रपटाशिवाय ती इतरही डिपार्टमेंटचं कामकाज सांभाळायची. श्वेताने ‘झूम’ नावाच्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. तरुणांमधील डान्स कल्चरवर आधारित हा चित्रपट होता.
गेल्या वर्षी सुभाष बब्बर यांनी पत्नी तिलोत्तमाला गमावलं होतं. त्या फुफ्फुसाशी संबंधित आजाराने ग्रस्त होत्या. त्यावेळी सुभाष हे आर्थिक समस्यांचा सामना करत असल्याचं वृत्त समोर आलं होतं. यामुळे पत्नीच्या उपचारांमध्ये अडथळे येत होते. त्यावेळी श्वेताने फिल्म इंडस्ट्रीत मदत मागितली होती.
2022 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सुभाष म्हणाले होते, “माझी मुलगी श्वेताने तिच्या बऱ्याच सहकाऱ्यांकडे आणि फिल्म इंडस्ट्रीत अनेकांकडे मदत मागितली. अनेकांनी माझ्या पत्नीच्या उपचारात मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. जुही चावला, डिंपल कपाडिया, अनिल कपूर, मिथुन चक्रवर्ती, भूषण कुमार यांसह रजन जैन, कोमल नाहटा, सलमान खान यांनीसुद्धा माझी खूप मदत केली.”
सुभाष बब्बर यांनी ‘डिस्को डान्सर’शिवाय ‘कसम पैदा करने वाले की’, ‘डान्स डान्स’, ‘जालिम’, ‘अपना कानून’, ‘तकदीर का बादशाह’, ‘आंधी तुफान’, ‘कमांडो’, ‘दुल्हन बनूं मै तेरी’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.