Disha Patani | ‘बाप्पाच्या दर्शनाला जाताना असे कपडे का घालावेत?’ दिशा पटानी जोरदार ट्रोल
अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतीच ती अंबानींच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचली होती. मात्र यावेळी तिचा मॉडर्न अंदाज पाहून नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली.
मुंबई | 20 सप्टेंबर 2023 : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या मुंबईतल्या अँटिलिया घरात मंगळवारी जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं. अंबानींच्या घरात प्रत्येक सोहळा किंवा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात पार पडतो आणि त्याला बॉलिवूडपासून क्रिकेट विश्वापर्यंत अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात. असंच काहीसं मंगळवारी संध्याकाळीही पाहायला मिळालं. बॉलिवूड, राजकारण आणि क्रिकेट विश्वातील सेलिब्रिटींनी अंबानींच्या घरी गणपती दर्शनासाठी हजेरी लावली. या सेलिब्रिटींना पारंपरिक अंदाजात पाहिलं गेलं. रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, सारा अली खान, जान्हवी कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी यांसारखे बरेच सेलिब्रिटी तिथे उपस्थित होते. पापाराझींनी या सेलिब्रिटींचे व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर अपलोड केले. मात्र या सर्वांत अभिनेत्री दिशा पटानी खूप ट्रोल होतेय.
अंबानींच्या घरातील गणपतीच्या दर्शनासाठी दिशा पटानी तिची खास मैत्रीण आणि प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉयसोबत पोहोचली होती. यावेळी दोघींनी साडी नेसली होती. मात्र साडीतही दिशाचा मॉडर्न अंदाज पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. मौनीने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. तर दिशाने सोनेरी रंगाची साडी नेसली होती. या साडीवरील दिशाच्या ब्लाऊजने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं. साडीवरील हा बोल्ड अंदाज नेटकऱ्यांना पसंत पडला नाही. त्यावरून अनेकांनी तिच्यावर टीका केली.
View this post on Instagram
‘इथे केल्विन क्लेइनसाठी शूट होत नाहीये, गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी चालली आहेस’, अशा शब्दांत एका युजरने सुनावलं. तर ‘साडीच्या सुंदर लूकला अश्लील कसं करायचं हे फक्त दिशालाच माहीत आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘ही पूजा करायला आली आहे आणि असे कपडे का परिधान केले आहेत’, असाही सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. दिशा नेहमीच तिच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अनेकदा तिला अंगप्रदर्शनामुळे ट्रोल करण्यात येतं.
याआधीही वाराणसीत गंगा आरती करताना दिशाने ज्या प्रकारचे कपडे परिधान केले होते, त्यावरून नेटकऱ्यांनी तिच्यावर प्रचंड टीका केली होती. गंगा आरती करताना दिशाने क्रॉप टॉप आणि त्यावर शॉल घेतला होता. ‘दिशाला कोणीतरी योग्य दिशा दाखवा’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिला सुनावलं होतं.