विवाहित अभिनेत्याशी अफेअर, घडवून आणला घटस्फोट? चर्चांवर भडकली अभिनेत्री
प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भारतीने तिच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर मौन सोडलं आहे. अभिनेता जी. व्ही. प्रकाशसोबत तिच्या अफेअरच्या चर्चा आहेत. या अफेअरमुळे त्याचा घटस्फोट झाल्याचं म्हटलं गेलंय. यावरूनच दिव्या भडकली आहे.

‘बॅचलर’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली दाक्षिणात्य अभिनेत्री दिव्या भारती सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. दिव्यावर अभिनेता आणि संगीतकार जी. व्ही. प्रकाशसोबत अफेअर आणि त्याचं लग्न मोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांवर अखेर दिव्याने मौन सोडलं आहे. “सर्व गोष्टी आता माझ्या डोक्यावरून जात आहेत”, असं तिने म्हटलंय. या आरोपांमध्ये बळजबरीने मला ओढलं जातंय आणि हे चुकीचं असल्याचं तिने सांगितलं आहे.
दिव्या भारतीची पोस्ट-
‘एका खासगी कौटुंबिक प्रकरणात माझं नाव ओढलं गेलंय, ज्याच्याशी माझा काहीच संबंध नाही. जी. व्हीच्या कौटुंबिक समस्यांशी माझं काहीच कनेक्शन नाही. स्पष्ट बोलायचं झालं तर मी कधीच कोणत्याही अभिनेत्याला डेट करणार नाही आणि अर्थातच विवाहित पुरुषाशी तर नाहीच नाही. अशा तथ्यहीन चर्चांकडे लक्ष देण्याची गरज नाही असं समजून मी आतापर्यंत शांत होते. परंतु हे सर्व आता मर्यादेपलीकडे गेलंय. अशा तथ्यहीन आरोपांमुळे मी माझी प्रतिमा खराब होऊ देमार नाही. मी स्वावलंबी आणि सशक्त महिला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं गॉसिप माझी प्रतिमा मलिन करू शकत नाही. अशा प्रकारची नकारात्मकचा पसरवण्याऐवजी एक चांगलं विश्व उभारण्यावर भर देऊयात. याप्रकरणी ही माझी पहिली आणि शेवटची प्रतिक्रिया आहे. धन्यवाद’, अशी तिने पोस्ट लिहिली आहे.




दिव्या आणि जी. व्ही. प्रकाश यांनी 2021 मध्ये ‘बॅचलर’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलंय. परंतु या चर्चांना आधीही दोघांनी फेटाळलं होतं. जी. व्ही. प्रकाश हा संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या बहिणीचा मुलगा आहे. पत्नी सैंधवीसोबत त्याचं नातं लग्नाच्या दहा वर्षांनंतर तुटलं. 2024 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला होता. त्यांना एक मुलगासुद्धा आहे.
सैंधवीनेही याबाबत स्पष्ट केलंय की एखाद्याच्या चारित्र्यावर निराधारपणे निशाणा साधणं चुकीचं आणि अस्वीकार्य आहे. त्याचप्रमाणे विभक्त होण्याचा निर्णय दोघांनीही त्यांच्या भल्यासाठी परस्पर संमतीने घेतला होता, असंही तिने स्पष्ट केलंय.