आयुष्य संपवण्याचा विचार करत होती प्रसिद्ध अभिनेत्री, राहुल गांधींनी वाचवले प्राण, 10 वर्षांनंतर खुलासा
दिव्या स्पंदना यांनी 2012 मध्ये युथ काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2013 मध्ये कर्नाटकमधील मांड्या लोकसभेच्या जागेसाठी झालेली पोटनिवडणूक त्यांनी लढवली आणि त्यात त्यांना यशही मिळालं होतं.
बेंगळुरू : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येच्या वृत्ताने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यानंतर ओडिया अभिनेत्री रुचिस्मिता गुरूने क्षुल्लक कारणावरून टोकाचं पाऊल उचललं. फिल्म इंडस्ट्रीतून अशा धक्कादायक बातम्या समोर येत असतानाच आता कन्नड अभिनेत्री आणि माजी लोकसभा खासदार दिव्या स्पंदना यांनी त्यांचा स्वत:चा अनुभव सांगितला आहे. दिव्या यांनी सांगितलं की जेव्हा त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते, तेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांना भावनिक आधार दिला होता. एका कन्नड टीव्ही टॉक शोमध्ये त्यांनी हा प्रसंग सांगितला.
कन्नड अभिनेत्री दिव्या या रम्या नावानेही ओळखल्या जातात. ‘वीकेंड विथ रमेश 5’च्या पहिल्या एपिसोडमध्ये त्यांनी हजेरी लावली होती. या एपिसोडमध्ये त्या त्यांच्या आयुष्यातील कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या.
वडिलांच्या निधनानंतर आत्महत्येचे विचार
वडिलांच्या मृत्यूनंतर दिव्या मानसिकदृष्ट्या खचून गेल्या होत्या. त्यांच्या मनात सतत आत्महत्येचे विचार घोंघावत होते. “वडिलांना गमावल्यानंतर मी दोन आठवड्यांनी संसदेत गेले. मी तिथे कोणालाच ओळखत नव्हती. मला काहीच माहीत नव्हतं. इतकंच नव्हे तर संसदेच्या कार्यपद्धतीविषयीही मला माहिती नव्हती”, असं त्या म्हणाल्या.
राहुल गांधींनी केली मदत
त्या कठीण काळात कामावर अधिक लक्ष केंद्रीत करून वडिलांच्या निधनाचं दु:ख पचवल्याचं त्यांनी सांगितलं. दिव्या स्पंदना यांनी काँग्रेसच्या सोशल मीडिया हेडचंही काम सांभाळलं होतं. वडिलांच्या निधनानंतर जेव्हा मनात आत्महत्येचे विचार येत होते, तेव्हा राहुल गांधी यांनी भावनिकदृष्ट्या साथ दिली, असंही त्यांनी पुढे सांगितलं. “माझ्या जीवनावर माझ्या आईचं फार प्रभुत्व होतं. त्यानंतर माझे वडील आणि मग राहुल गांधी. वडिलांना गमावल्यानंतर मी आत्महत्येचा विचार करत होती. त्याचवेळी मी निवडणुकीतही अपयशी ठरले होते. त्या कठीण काळात राहुल गांधींनी माझी मदत केली आणि मला भावनिक आधार दिला.”
करिअरच्या शिखरावर असताना दिव्या यांनी राजकारणात प्रवेश केला. 2012 मध्ये त्यांनी युथ काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2013 मध्ये कर्नाटकमधील मांड्या लोकसभेच्या जागेसाठी झालेली पोटनिवडणूक त्यांनी लढवली आणि त्यात त्यांना यशही मिळालं होतं. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीच काँग्रेसच्या सोशल मीडिया मोहिमेचं नेतृत्व केलं. मात्र निकाल काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागला नाही. दिव्या यांनी काँग्रेसचं सोशल मीडिया हाताळणं आणि राजकारणंही सोडलं. मात्र गेल्या वर्षी त्यांनी चित्रपटसृष्टीत परतण्याचं जाहीर केलं. त्यांनी स्वत:चं प्रॉडक्शन हाऊससुद्धा बनवलं आहे.