तुला मॅनर्स हा शब्द कळतो का? वर्षा उसगांवकरांना उलटसुलट बोलणाऱ्या निक्कीवर भडकला अभिनेता
बिग बॉस मराठीच्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यात जोरदार भांडण झाल्याचं पहायला मिळालं. यावरून आता अभिनेता पुष्कर जोगने निक्कीला सुनावलं आहे. तुला मॅनर्स हा शब्द कळतो का, असं त्याने म्हटलंय.

‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन 28 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाचा सिझन अगदी पहिल्या एपिसोडपासूनच सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. यामागचं कारणंही तसंच आहे. निक्की तांबोळीने बिग बॉसच्या घरात प्रवेश करताच भांडणाला सुरुवात केली आहे. घरातील अनेक स्पर्धकांसोबत तिचं भांडण झाल्याचं पहायला मिळतंय. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये ती अभिनेत्री वर्षा उसगांवकरांसोबत उलटसुलट बोलताना दिसली. यावरून नेटकऱ्यांनी आणि मराठी कलाविश्वातील काही कलाकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक उत्कर्ष शिंदेनंतर आता अभिनेता पुष्कर जोगनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित निक्कीला सुनावलं आहे?
नेमकं काय घडलं?
‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करताच स्पर्धकांसमोर विविध आव्हानं उभी राहिली आहेत. यावेळी घरातील प्रत्येक सदस्याला बीबी करन्सी खर्च करून सामान विकत घ्यावं लागतंय. त्यातच बेड खरेदी न केल्याने बिग बॉसने सर्वांना जमिनीवर झोपावं लागेल असे आदेश दिले. तसंच घरात दिवसभर कोणीही बेडचा वापर करू नये, असंही सांगण्यात आलं होतं. तरीही काही स्पर्धकांकडून या नियमाचा भंग झाला आणि त्याचीच शिक्षा म्हणून बिग बॉसने संपूर्ण आठवडाभार बेडचा वापर करायचा नाही, अशी शिक्षा सुनावली आहे. यावरून निक्की वर्षा यांच्यावर भडकते. “तुमच्यामुळे आम्हाला भोगावं लागतंय. तुम्ही बाहेर खूप मोठ्या असाल पण घरात सगळेच सारखे आहेत”, अशा शब्दांत ती उसगांवकर यांना सुनावते. त्यानंतर वर्षासुद्धा तिला प्रत्युत्तर देतात. दोघांमधील ही बाचाबाची वाढतच जाते आणि नंतर दोघीही रडू लागतात.
पुष्कर जोगची पोस्ट-
‘निक्की, तुला ‘मॅनर्स’ (शिष्टाचार) हा शब्द माहित आहे का? इतक्या ज्येष्ठ आणि नामवंत अभिनेत्री वर्षा उसगांवकरांना मिळणारी अशी वागणूक पाहून खूप वाईट वाटतंय. मॅम, आम्ही तुमच्यासोबत आहोत. खेळ खेळण्याची एक पद्धत असते. या खेळात प्रतिष्ठा सोडून वागू नये. वर्षा मॅम, मी तुमच्या बाजूने उभा आहे’, अशा शब्दांत त्याने निक्की तांबोळीला सुनावलं आहे.




याआधी उत्कर्ष शिंदेने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये वर्षा आणि निक्की यांचा फोटो शेअर करत लिहिलं होतं, ‘आलिया भोगासी असावे सादर!’ बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळीचं विविध स्पर्धकांशी सतत भांडणं होत आहेत. नॉमिनेशनच्या टास्कदरम्यान निक्कीचं ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर हिच्यासोबतही भांडण होतं. यानंतर अंकिता एका कोपऱ्यात जाऊन रडत बसते.