डॉक्टरांना सैफच्या शरीरात आढळला धारदार तुकडा; कशी आहे प्रकृती?
अभिनेता सैफ अली खानवर चोराने चाकूहल्ला केला असून लिलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सैफच्या शरीरावर सहा जखमा असून त्यापैकी दोन जखमा खोलवर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे इथल्या घरात एका चोराने चाकूहल्ला केला. चोराने सैफवर सहा वार केले आहेत. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी सैफ आणि त्याच्या घरातील इतर सदस्य गाढ झोपेत होते. हल्ल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य जागे होताच चोराने तिथून पळ काढला. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मुंबई पोलिसांची टीम आणि एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक सैफच्या घराजवळ तपासासाठी पोहोचले आहेत. हल्ल्यानंतर सैफला तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर सर्जरी करण्यात येत आहे. चोराने सैफवर थेट चाकूहल्ला केला की त्याच्यासोबत झालेल्या झटापटीत सैफला चाकू लागला, हे अद्याप स्पष्ट झालं नाही.
लिलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ. नीरज उत्तमणी याविषयी म्हणाले, “सैफवर एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या घरात हल्ला केला. त्याला मध्यरात्री 3.30 वाजता लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या शरीरावर सहा जखमा असून त्यापैकी दोन जखमा खोलवर आहेत. एक जखम सैफच्या मणक्याजवळ आहे. डॉक्टर सध्या त्याच्यावर सर्जरी करत आहेत. न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि ॲनेस्थेटिस्ट निशा गांधी त्याच्यावर उपचार करत आहेत. सर्जरी झाल्यानंतरच आम्ही त्याविषयी अधिक माहिती देऊ शकतो.”
#WATCH | Film director Siddharth Anand arrives at Lilavati Hospital in Bandra, Mumbai
Actor Saif Ali Khan is admitted here following an attack on him by an intruder at his home in Bandra pic.twitter.com/sonBAbw3Qs
— ANI (@ANI) January 16, 2025
डॉ. उत्तमणी असंही म्हणाले की सैफच्या मानेवर आणखी एक जखम असून त्यावरही उपचार केले जात आहेत. पहाटे 5.30 वाजता सैफवर शस्त्रक्रिया सुरू झाली असून ती अद्याप सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. लिलावती रुग्णालयातील एका डॉक्टरने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितलं की, डॉक्टरांना सैफच्या शरीराच चाकूचा तुकडाही आढळला आहे. सैफची ही जखमी किती खोलवर आहे, याची तपासणी ते करत आहेत. त्याचसोबत त्याची प्रकृती स्थिर असून तो हातापायांची हालचाल करू शकतोय, असंही कळतंय.
दरम्यान सैफ अली खानवर हल्ला करणारी व्यक्ती ही रात्रभर त्याच्या घरात दबा धरून बसली होती, अशीही माहिती समोर येत आहे. रात्री दोन वाजता त्याच्या घरातील महिला कर्मचाऱ्यांशी वाद सुरू असल्याचा आवाज सैफला आला. हा आवाज ऐकून तो बाहेर आला, तेव्हा चोराने त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोर हा घरातील महिला कर्मचाऱ्यांशी संबंधित होता का? तो आत कसा आला? तो चोरी करण्यासाठी आला होता का? याचा पोलीस तपास करत आहेत.