‘या’ जगप्रसिद्ध रॅपरने शाहरुखच्या KKR टीमवर लावला कोट्यवधींचा सट्टा
ग्रॅमी पुरस्कार जिंकलेल्या जगप्रसिद्ध रॅपरने शाहरुख खानच्या 'कोलकाता नाइट रायडर्स' या संघाच्या विजयाबाबत सट्टा लावला आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्यात केकेआरच्या विजयासाठी त्याने कोट्यवधी रुपयांचा सट्टा लावला आहे.
संगीत क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कार आपल्या नावे करणारा कॅनेडियन रॅपर ड्रेक याने आयपीएलच्या अंतिम सामन्यावर सट्टा लावला आहे. याविषयी खुद्द त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित माहिती दिली आहे. शाहरुख खानच्या ‘कोलकाता नाइट रायडर्स’ या संघावर त्याने कोट्यवधी रुपयांचा सट्टा लावला आहे. 250,000 अमेरिकन डॉलर्सचा हा सट्टा असून त्याचं भारतीय रुपयांमध्ये रुपांतरित केल्यास ही रक्कम जवळपास 2.07 कोटी रुपये इतकी होते. ड्रेकने एखाद्या खेळावर अशा पद्धतीने सट्टा लावण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने विविध खेळांमध्ये रुची दाखवत सट्टेबाजी केली आहे. बास्केटबॉल, फुलबॉल आणि रग्बी यांसारख्या खेळांवर त्याने सट्टा लावला आहे. मात्र क्रिकेटच्या सामन्यात त्याने पहिल्यांदाच एवढी मोठी रक्कम लावली आहे. त्याच्या पावतीचा स्क्रीनशॉटदेखील त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ड्रेकचा मॅनेजर सुरेशकुमार सुब्रमण्यमने दुसऱ्या टीमवर सट्टा लावला होता. त्यामुळे त्याला उपरोधिक टोला लगावत ड्रेकने पुढे लिहिलं, ‘सुरेशकुमारची टीम बाद झाल्याने मी केकेआरवर माझा क्रिकेटमधील पहिला सट्टा लावला आहे. कोरबो, लोरबो, जितबो.’ या हाय प्रोफाइल सट्ट्यामुळे आयपीएलच्या अंतिम सामन्याविषयी क्रिकेटप्रेमींमध्ये अधिक उत्सुकता वाढली आहे.
कोलकाता हा यंदाच्या हंगामात सर्वांत सातत्यपूर्ण कामगिरी करणारा संघ म्हणून पुढे आला. श्रेयस अय्यरचं चाणाक्ष नेतृत्व, त्याला मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आणि मेंटॉर गौतम गंभीरच्या अचूक योजनांची मिळालेली साथ यामुळे कोलकाताने 14 पैकी नऊ साखळी सामने जिंकताना गुणतालिकेत अग्रस्थान पटकावलंय. त्यानंतर क्वालिफायर-1 च्या सामन्यात हैदराबादला नमवत कोलकाताने अंतिम फेरीत स्थान मिळवलं. आता हैदराबादवर पुन्हा वर्चस्व गाजवत तिसऱ्यांदा आयपीएल जिंकण्याचा कोलकाताचा प्रयत्न असेल.
कोलकाता नाइट रायडर्स या टीमचा सहमालक शाहरुख खानला नुकतंच अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उष्माघाताचा त्रास जाणवल्याने शाहरुखला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता केकेआरच्या मॅचसाठी तो कुटुंबीयांसह स्टेडियमवर उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. शाहरुखची मुलगी सुहाना खान तिची मैत्रीण अनन्या पांडेसह चेन्नईला रवाना झाली आहे.