Drishyam 2: प्रदर्शनानंतर काही तासांतच अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ला मोठा झटका
'दृश्यम 2'कडून जबरदस्त कमाईची अपेक्षा असतानाच बसला 'या' गोष्टीचा मोठा फटका
मुंबई: ‘दो अक्तूबर को क्या हुआ था’, हा प्रश्न चित्रपटप्रेमींना चांगलाच ठाऊक असेल. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ या चित्रपटातील हा डायलॉग खूप गाजला. त्यावरून आजही मीम्स व्हायरल होतात. आता या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘दृश्यम 2’ने जबरदस्त अॅडव्हान्स बुकिंग केली आहे. इतकंच नव्हे तर पहिल्याच दिवशी सोशल मीडियावर या चित्रपटाचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कमाई करेल अशी अपेक्षा असतानाच आता एक मोठा फटका बसला आहे.
तमिलरॉकर्स आणि फिल्मझिला या वेबसाइट्सवर ‘दृश्यम 2’ लीक करण्यात आला आहे. प्रदर्शनानंतर काही तासांतच अजय देवगणचा हा चित्रपट ऑनलाइन लीक करण्यात आला. त्यामुळे चित्रपटाच्या कमाईवर त्याचा मोठा फटका बसू शकतो. हे दोन्ही वेबसाइट्स चित्रपट लीक करण्यासाठी कुख्यात आहेत.
चित्रपट ऑनलाइन लीक झाल्यामुळे निर्मात्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. चित्रपट लीक झाल्यामुळे आजवर अनेक चित्रपटांच्या कमाईवर फटका बसला. आता दृश्यम 2 या चित्रपटालासुद्धा अशा समस्येचा सामना करावा लागत आहे.
दृश्यम आणि दृश्यम 2 हे साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्या मल्याळम चित्रपटाचे हिंदी रिमेक आहेत. मल्याळम चित्रपट पाहिला असला तरी हिंदी व्हर्जन तुम्हाला निराश नक्कीच करणार नाही, असं मत चित्रपट समीक्षकांनी मांडलं होतं. मात्र चित्रपट लीक झाल्याचा सर्वाधिक फटका हा सस्पेन्स ड्रामालाच बसतो. त्यामुळे आता चित्रपटाची टीम यावर कोणता उपाय शोधणार किंवा कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अभिषेक पाठक दिग्दर्शित या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत भुल भुलैय्या 2 आणि RRR (हिंदी) या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिस थिएटर्समध्ये गुरुवारी या चित्रपटाची 1.16 लाख तिकिटं विकली गेली. ॲडव्हान्स बुकिंगमधून जवळपास सहा कोटी रुपयांची कमाई होणार असल्याचा अंदाज आहे.