टॅक्सी ड्रायव्हर म्हणून केलं काम, हॉटेलमध्ये बनला वेटर; सुपरस्टार बनताच ‘मिस युनिव्हर्स’ झाली त्याची गर्लफ्रेंड
फोटोमध्ये दिसणाऱ्या या चिमुकल्यानेही मुंबईत आल्यानंतर इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी बराच संघर्ष केला. या प्रयत्नांमध्ये त्याला यश मिळालं आणि आज तो बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे.
मुंबई : स्वप्नांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत असंख्य कलाकार बॉलिवूड इंडस्ट्रीत नाव कमावण्याची इच्छा मनात घेऊन खूप आशेनं येतात. मात्र ज्या कलाकारांचा कोणताच गॉडफादर नसतो, त्यांचा आपला ठसा उमटविण्यासाठी बराच काळ संघर्ष करावा लागतो. या संघर्षानंतर काहींचं नशीब चमकतं तर काहींना अपयशाचा सामना करावा लागतो. फोटोमध्ये दिसणाऱ्या या चिमुकल्यानेही मुंबईत आल्यानंतर इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी बराच संघर्ष केला. या प्रयत्नांमध्ये त्याला यश मिळालं आणि आज तो बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. प्रसिद्ध अभिनेता झाल्यानंतर त्याने मिस युनिव्हर्सलाही डेट केलं होतं.
या फोटोत दिसणारा हा चिमुकला अभिनेता रणदीप हुड्डा आहे. रणदीपने बॉलिवूडमध्ये कमी चित्रपटांमध्ये काम केलं असलं तरी त्याने प्रत्येक भूमिकेतून आपली विशेष छाप सोडली आहे. बॉलिवूडमधील हँडसम अभिनेत्यांच्या यादीत त्याचा समावेश होतो. रणदीपने ‘मान्सून वेडिंग’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने जिस्म 2, किक, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, सरबजीत, कॉकटेल यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. सोनीपत इथं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो पुढील शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न याठिकाणी गेला. त्याठिकाणी शिक्षण घेत राहणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. अशा वेळी त्याने टॅक्सी ड्राइव्हर आणि हॉटेलमध्ये वेटरचं काम केलं. याविषयीचा खुलासा त्याने स्वत: विविध मुलाखतींमध्ये केला आहे.
View this post on Instagram
रणदीप लहान असतानाच त्याचे आईवडील विभक्त झाले. त्यामुळे तो त्याच्या आजीसोबत राहायचा. आपल्या आईवडिलांनी आपली फसवणूक केली असेही विचार अनेकदा त्याच्या मनात यायचे. चित्रपटांसोबत तो त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. एकेकाळी त्याने मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनला डेट केलं होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.
रणदीप सध्या त्याच्या आगामी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. या बायोपिकचं शूटिंग जून महिन्यापासून सुरू झालं असून लंडन, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार द्विपसमूहातील विविध ठिकाणी याचं शूटिंग पार पडणार आहे. “देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विनायक दामोदर सावरकर यांच्या योगदानाकडे आजपर्यंत दुर्लक्ष केलं गेलं. त्यांची कथा ही जगासमोर आणायलाच हवी. ही भूमिका साकारणं माझ्यासाठी अत्यंत आव्हानात्मक असेल”, अशी भावना रणदीपने व्यक्त केली.