‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरे – अब्दु रोझिक ईडीच्या रडारवर; नेमकं काय आहे प्रकरण?
बिग बॉस फेम शिव ठाकरे आणि अब्दु रोझिक हे ईडीच्या रडारवर आले आहेत. या दोघांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहेत. मनी लाँड्रींगशी संबंधित हे प्रकरण आहे. याप्रकरणी दोघांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे.
मुंबई : 22 फेब्रुवारी 2024 | ‘बिग बॉस’ फेम अभिनेता शिव ठाकरे आणि ताजिकिस्तानी गायक अब्दु रोझिक मोठ्या अडचणीत येऊ शकतात. कारण ईडीने या दोघांना मनी लाँड्रींग प्रकरणात समन्स बजावले आहेत. हे प्रकरण तुरुंगात असलेल्या ड्रग माफिया अली असगर शिराजीशी संबंधित मनी लाँड्रींग प्रकरण आहे. याविषयी ईडीने अब्दु आणि शिव यांना समन्स बजावून त्यांची चौकशी केली आहे. या मनी लाँड्रींग प्रकरणात शिव ठाकरे आणि अब्दु रोझिक यांची कोणतीच भूमिका नाही. मात्र फक्त या हाय प्रोफाइल केसमध्ये साक्ष देण्यासाठी त्यांना बोलावण्यात आलं होतं. या दोघांची चौकशी केल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
रिपोर्ट्सनुसार, ज्या अली असगर शिराजीच्या मनी लाँड्रींग प्रकरणात या दोघांना समन्स बजावण्यात आले आहेत, तो हसलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड नावाने एक कंपनी चालवत होता. अलीची ही कंपनी अनेक वेगवेगळ्या स्टार्ट-अप्सना फायनान्स पुरवत होती. अब्दु रोझिकच्या मुंबईतील ‘बुर्गिर’ या रेस्टॉरंटमध्ये आणि शिव ठाकरेच्या ‘ठाकरे चाय अँड स्नॅक्स’ या रेस्टॉरंटमध्ये या कंपनीने पैसे गुंतवले होते. मात्र अलीची कंपनी नार्को-फंडिंगच्या माध्यमातून पैसे कमावत असल्याची कोणतीच माहिती नसल्याचं शिव ठाकरेनं चौकशीदरम्यान स्पष्ट केलं. तर अब्दु रोझिकला याबद्दल कळताच त्याने कंपनीशी करार संपवल्याची माहिती दिली.
2022-23 मध्ये एका व्यक्तीच्या माध्यमातून त्याची भेट हसलर्स हॉस्पिटॅलिटीचे संचालक कृणाल ओझाशी झाली होती. कृणालने त्याला ठाकरे चाय अँड स्नॅक्सच्या पार्टनरशिप डीलची ऑफर दिली होती. या करारानुसार, हसलर्स हॉस्पिटॅलिटीने शिव ठाकरेच्या रेस्टॉरंटमध्ये मोठी रक्कम गुंतवली होती. शिव आणि अब्दु हे दोघं ‘बिग बॉस 16’मध्ये एकत्र सहभागी झाले होते. या दोघांमध्ये बिग बॉसच्या घरात चांगली मैत्री झाली होती. हे दोघं स्पर्धक या सिझनमध्ये लोकप्रिय ठरले होते. सध्या शिव ठाकरे ‘झलक दिखला जा 11’ या डान्स रिअॅलिटी शोद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.