गर्लफ्रेंडवर धर्मांतराचा दबाव? ब्रेकअपनंतरच्या चर्चांवर अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
पवित्रा आणि एजाजने 2022 मध्ये साखरपुडासुद्धा केला होता. मात्र लग्नापूर्वीच त्यांचं नातं संपुष्टात आलं. एजाजकडून धर्म परिवर्तनासाठी दबाव असल्याची बाब पवित्राच्या एका मुलाखतीनंतर चर्चेत आली होती.
अभिनेत्री पवित्रा पुनिया आणि एजाज खान हे दोघं ‘बिग बॉस 14’ दरम्यान एकमेकांना डेट करू लागले. जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी साखरपुडासुद्धा केला. मात्र लग्नाआधीच त्यांचं नातं संपुष्टात आलं. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पवित्रा आणि एजाजचा काही महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाला. आता पवित्राने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीनंतर एजाजने तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणल्याच्या चर्चांना उधाण आलंय. यामुळे पवित्राने त्याच्याशी ब्रेकअप केला, अशा आशयाचे वृत्त समोर आले. त्यानंतर आता एजाजने त्याची बाजू स्पष्ट केली आहे.
एजाजने त्याच्या प्रवक्त्याच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे. “एजाजच्या वडिलांना त्यांच्या मित्रांकडून कॉल्स येत आहेत की तुमच्या मुलाने गर्लफ्रेंडवर इस्लाममध्ये धर्मांतरासाठी दबाव टाकला का? ते खूप दुखावले गेले आहेत. एजाज आणि पवित्राच्या नात्यात धर्म हा कधीच निकष नव्हता. आता त्यांच्या ब्रेकअपनंतर हा मुद्दा सर्व ठिकाणी ओढला जातोय. एजाज हा पवित्रासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं समजल्यावर त्याच्या वडिलांना खूप आनंद झाला होता. कारण त्यांच्यासाठी धर्म महत्त्वाचा नव्हता. मुलाखतीत जेव्हा पवित्राला ब्रेकअपमागील कारण विचारलं गेलं, तेव्हा तिनेसुद्धा स्पष्टपणे नकार दिला होता. मी कधीच धर्मांतर करणार नाही, हे तिने रिलेशनशिपच्या सुरुवातीलाच स्पष्ट केलं होतं. आता त्याच मुलाखतीमधला धर्माचा मुद्दा उचलून वाद निर्माण केला जातोय”, अशी एजाजची बाजू त्याच्या प्रवक्त्याने मांडली आहे.
View this post on Instagram
“एजाज सर्व धर्मातील सण-उत्सव साजरा करतो आणि हे त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सहज स्पष्ट होतं. त्याच्या नवीन प्रोजेक्टच्या रिलीजच्या आधी तो तिरुपती बालाजी आणि सिद्धिविनायक मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतो. पवित्रासोबत रिलेशनशिपमध्ये असताना एजाजने तिच्यासोबत मिळून गणेश चतुर्थी आणि दिवाळीसारखे सण-उत्सव साजरे केले,” असंही प्रवक्यांनी स्पष्ट केलंय.
एजाजकडून धर्मांतराचा दबाव होत असल्याने पवित्राने ब्रेकअप केल्याची जोरदार चर्चा होती. त्यावर पवित्रा म्हणाली होती, “नाही, माझ्या कुटुंबीयांनी माझी खूप साथ दिली. या इंडस्ट्रीत जात-पात, धर्म यांना कोणतीच जागा नसल्याचं त्यांना माहीत आहे. मी एजाजला आधीच स्पष्ट केलं होतं की मी माझा धर्म बदलणार नाही. जर एखादी व्यक्ती त्याच्या धर्माशी प्रामाणिक राहत नसेल तर ती तुमच्याशी कशी प्रामाणिक राहील?”