‘फक्त मी तोंड उघडेपर्यंत..’; ‘त्या’ इंटिमेट सीनबद्दल बोलताच राम कपूरवर भडकली एकता कपूर?
अभिनेता राम कपूरने 'बडे अच्छे लगते है' या मालिकेतील इंटिमेट सीनबद्दल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वक्तव्य केल्यानंतर आता निर्माती एकता कपूरची पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टद्वारे तिने रामला अप्रत्यक्ष टोमणा मारल्याचं म्हटलं जातंय.
‘बडे अच्छे लगते हैं’ या गाजलेल्या मालिकेत मुख्य भूमिका साकारलेला प्रसिद्ध टीव्ही अभिनेता राम कपूरने नुकतीच दिलेली एक मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तो मालिकेतील 17 मिनिटांच्या इंटिमेट सीनबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला होता. मालिकेत राम कपूरसोबत अभिनेत्री साक्षी तंवरने मुख्य भूमिका साकारली होती. टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच या दोघांमध्ये इंटिमेट सीन शूट करण्यात आला होता. या सीनमुळे निर्माती एकता कपूरला त्याकाळी प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. इतकंच नव्हे तर त्याचा फटका टीआरपीवर झाल्याचा खुलासा रामने केला. आता रामच्या या मुलाखतीनंतर एकता कपूरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे तिने अप्रत्यक्षपणे रामला टोमणा मारल्याचा अंदाज नेटकरी व्यक्त करत आहेत.
काय म्हणाला राम कपूर?
“अभिनेमा म्हणून माझं जे काम आहे, ते करणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मी कोणालाच स्पष्टीकरण देण्यासाठी बांधिल नाही. स्क्रिप्ट जशी लिहिली असेल त्याला तसं मी फॉलो करतो. हे मी करू शकत नाही, असं मी कसं म्हणू शकतो. निर्माती एकता कपूरने तो इंटिमेट सीन लिहिला होता आणि आम्ही तो सीन करावा अशी तिचीच इच्छा होती. मी एकताला विचारलं की, ‘तुला खात्री आहे का?’ कारण ते टेलिव्हिजनवर असं आधी कधीच झालं नव्हतं. टेलिव्हिजनवरील तो पहिला किसिंग सीन होता. त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट होती. पण एकता त्या सीनबद्दल खूप कॉन्फीडंट होती. तिला तो सीन मालिकेत दाखवायचा होता. मग मीसुद्धा ठीक आहे म्हणालो”, असं रामने सांगितलं. मात्र या सीनचा परिणाम मालिकेच्या टीआरपीवर झाल्याचं रामने पुढे स्पष्ट केलं. लिपलॉक सीनच्या आधी मालिकेची रेटिंग सहा आणि पाच अशी होती. मात्र त्या इंटिमेट सीननंतर ही रेटिंग थेट दोनवर आली होती.
एकता कपूरची पोस्ट-
‘माझ्या शोबद्दल मुलाखती देणाऱ्या अनप्रोफेशनल कलाकारांनी गप्प बसावं. खोटी माहिती आणि तिरकस कथा.. फक्त मी तोंड उघडेपर्यंत टिकू शकतं. पण मौन राहण्यात प्रतिष्ठा असते’, अशी पोस्ट एकताने लिहिली आहे. ही पोस्ट वाचून तिने अप्रत्यक्षपणे राम कपूरवरच निशाणा साधल्याचं नेटकरी म्हणत आहेत. कारण रामनेच नुकतीच मुलाखत दिली होती. एकता नंतर या मालिकेतील कलाकारांच्या परफॉर्मन्सवर फारशी खुश नव्हती, असंही काहींनी म्हटलंय. ‘बडे अच्छे लगते हैं’ ही मालिका सोनी टीव्हीवर 2011 ते 2014 दरम्यान प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.