“मुलाला कॅन्सर झाला तेव्हा त्याला सोडून..”; आयुष्यातील कठीण काळाविषयी इमरान हाश्मी व्यक्त
2014 मध्ये अभिनेता इमरान हाश्मीचा मुलगा अयान हाश्मीला कॅन्सरचं निदान झालं होतं. त्याच्या उपचारासाठी इमरानला कॅनडाला जावं लागलं होतं. या कठीण काळाचा सामना कसा केला याविषयी तो नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाला.
मुंबई : 24 फेब्रुवारी 2024 | अभिनेता इमरान हाश्मीच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळ तेव्हा होता, जेव्हा त्याचा मुलगा अयान हाश्मीला फर्स्ट-स्टेज कॅन्सरचं निदान झालं होतं. 2014 मध्ये अयानवर कॅन्सरचे उपचार झाले. त्यावेळी परिस्थिती काय होती आणि त्याचा सामना कसा केला, याविषयी इमरान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाला. एक वडील म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असतानाच करिअरमधील काही गोष्टी कशा पद्धतीने सांभाळल्या, याविषयी त्याने सांगितलं. त्या कठीण काळात निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट यांनी इमरानला महत्त्वपूर्ण सल्ला दिला होता.
‘रेडिओ नशा’ला दिलेल्या मुलाखतीत इमरान म्हणाला, “त्या टप्प्यातून बाहेर पडण्याची एक वेगळीच जिद्द माझ्यात आणि माझ्या कुटुंबीयांमध्ये होती. भविष्यात आपल्यासमोर काय वाढून ठेवलंय, हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे तुम्हाला सर्वोत्कृष्ट असं काही वाटत नाही. पण तुमची जगण्याची जिद्द तुम्हाला पुढे मार्ग दाखवते. मला स्वत:ला त्यातून पुढे जायचं होतं. त्याचवेळी कामाच्या काही गोष्टी सांभाळणं खूप कठीण होतं. पण अखेर हेच खरं जग आहे.”
View this post on Instagram
महेश भट्ट यांनी दिलेल्या सल्ल्याविषयी सांगताना इमरान पुढे म्हणाला, “जेव्हा माझ्या मुलाला कॅन्सरचं निदान झालं तेव्हा भट्ट साहेबांनी (महेश भट्ट) मला एक महत्त्वपूर्ण सल्ला दिला होता. माझ्यासाठी ते गुरूसमान आहेत. लोक कशा पद्धतीने विचार करतात, हे त्यांना नीट समजतं. ही इंडस्ट्री खूप रिअलिस्टिक आहे. त्यांना तुमच्याबद्दल वाईट वाटेल, ते तुमची मदतसुद्धा करतील पण त्याचवेळी काही लोकांनी तुमच्यावर पैसेसुद्धा गुंतवलेले असतात. म्हणून भट्ट साहेबांनी मला सांगितलं की ज्या ज्या निर्मात्यांसोबत तू काम करतोयस, त्या प्रत्येकाला फोन करून तू आश्वासन दे की त्यांचे चित्रपट पूर्ण करशील. माझ्या मुलाच्या आजारपणाबद्दल कळल्याच्या दोन आठवड्यांतच हे सर्व करावं लागलं होतं. भट्ट साहेब म्हणाले की ते सर्वजण तुझ्या पाठिशी उभे राहतील पण त्याचसोबत ते त्यांच्या गुंतवणुकीचाही विचार करतील. हे कितपत योग्य किंवा अयोग्य आहे मला माहीत नाही. पण हे जग असंच आहे.”
“मी निर्मात्यांना सांगितलं की मी फक्त महिना ते दीड महिना परदेशात मुलाच्या उपचारासाठी जाणार आहे. पण खरंतर कॅनडामध्ये सात महिन्यांपर्यंत मुलावर उपचार सुरू होते. मी पुन्हा भारतात आलो. त्यासाठी मला मुलाशी खोटं बोलावं लागलं होतं. मी भारतात येऊन त्या चित्रपटांचं शूटिंग पूर्ण केलं आणि त्यानंतर पुन्हा कॅनडाला गेलो. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता”, अशा शब्दांत इमरान हाश्मी व्यक्त झाला. कॅन्सर निदान झाल्याच्या पाच वर्षांनंतर अयान हाश्मी कॅन्सरमुक्त झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. 2019 मध्ये इमरानचा मुलगा पूर्णपणे बरा झाला.