वडील धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर ईशा देओलची प्रतिक्रिया; म्हणाली “आम्ही सर्वजण थक्क..”
याआधी दिलेल्या एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनीसुद्धा ऑनस्क्रीन किसिंग सीन करण्याची तयारी असल्याचं सांगितलं होतं. 'इंडिया डॉटकॉम'ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, "का नाही करणार? नक्कीच करणार."
मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. या चित्रपटातील त्यांच्या एका सीनची जोरदार चर्चा झाली होती. अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासोबतचा हा त्यांचा किसिंग सीन होता. धर्मेंद्र आणि शबाना झामी यांच्या किसिंग सीनवर आतापर्यंत हेमा मालिनी, सनी देओल आणि जावेद अख्तर यांनी मोकळेपणे प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलने त्यावर आपलं मत मांडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनबद्दल माहित होतं का, असा प्रश्न विचारण्यात आला.
या मुलाखतीत ईशाने सांगितलं की तिला त्या सीनविषयी काहीच माहिती नव्हती. “नाही, मला त्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. किंबहुना आम्हाला कोणालाच त्याविषयी माहीत नव्हतं. आमच्यासाठी ते एक सरप्राइज होतं. ते दोघंही खूप प्रेमळ आहेत आणि ते दोघं प्रोफेशनल अभिनेते आहेत”, असं ती म्हणाली. याआधी दिलेल्या एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनीसुद्धा ऑनस्क्रीन किसिंग सीन करण्याची तयारी असल्याचं सांगितलं होतं. ‘इंडिया डॉटकॉम’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “का नाही करणार? नक्कीच करणार. जर असा एखादा सीन चित्रपटाच्या कथेसाठी महत्त्वाचा असेल, तर मी कदाचित तो सीन करू शकेन.”
या सीनविषयी शबाना आझमी म्हणाल्या होत्या, “माझ्या सीनची इतकी चर्चा होईल असं मला वाटलं नव्हतं. जेव्हा पडद्यावर आमचा किसिंग सीन येतो तेव्हा लोक टाळ्या वाजवतायत, हसत आहेत. त्या सीनच्या शूटिंगदरम्यान आम्हाला कोणतीच समस्या नव्हती. हे खरंय की याआधी मी स्क्रीनवर असे सीन्स फारसे केले नव्हते. पण धर्मेंद्र यांच्यासारख्या हँडसम व्यक्तीला कोणाला किस न करावंसं वाटेल?”
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाद्वारे करण जोहरने जवळपास सात वर्षांनंतर दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन केलं आहे. यामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्यांच्यासोबतच जया बच्चन, धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पंजाबी कुटुंबातील रॉकी आणि बंगाली कुटुंबातील रानीची ही प्रेमकहाणी आहे.