स्टारकिड्सने माझ्या भूमिका हिसकावल्या; अमीषाच्या आरोपांवर ईशा देओलचं उत्तर
'गदर 2' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्री अमीषा पटेलने बॉलिवूडच्या स्टारकिड्सवर तिच्याकडून भूमिका हिसकावल्याचा आरोप केला होता. त्यावर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ईशा देओलने उत्तर दिलं आहे.
अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओलने 2000 च्या सुरुवातीला बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याचवेळी करीना कपूर, अमीषा पटेल आणि प्रियांका चोप्रा यांसारख्या अभिनेत्रीसुद्धा इंडस्ट्रीत नव्यानेच आल्या होत्या. गेल्या वर्षी ‘गदर 2’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अमीषाने करीना आणि ईशा यांसारख्या स्टारकिड्सवर आरोप केला होता. “स्टारकिड्सने माझ्याकडून भूमिका हिसकावून घेतल्या”, असं ती म्हणाली होती. त्यावर आता ईशा देओलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.
अमीषाच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना ईशा देओल ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “ती असं म्हणाली का? याबाबतीत माझे विचार खूप वेगळे आहेत. माझ्या मते आम्हाला ज्या भूमिका मिळाल्या होत्या, त्यातच आम्ही खूप व्यग्र होतो. त्यावेळी इंडस्ट्रीत माझ्या चांगल्या मैत्रिणीसुद्धा बनल्या होत्या. कोणीच कोणाकडून भूमिका हिसकावल्या नव्हत्या, असं मला वाटतं. प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र होते आणि आपल्या चौकटीत काम करून ते खुश होते. इंडस्ट्रीत प्रत्येक जण खूप मैत्रीपूर्ण वागत होते, सर्व मुली आणि मुलंसुद्धा चांगली वागणूक द्यायचे. आम्हा सर्वांकडे खूप काम होतं, बरेच प्रोजेक्ट्स होते. आमच्यापैकी कोणीच कामाविना बसलं नव्हतं.”
View this post on Instagram
याआधी दिलेल्या एका मुलाखतीत अमीषा म्हणाली होती, “जेव्हा मी फिल्म इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा इतर अभिनेत्यांची मुलं आणि निर्मात्यांची मुलंच इंडस्ट्रीत येत होती. करीना कपूर, अभिषेक बच्चन, हृतिक रोशन, तुषार कपूर, फरदीन खान, ईशा देओल.. यांसारखे अनेक स्टारकिड्स त्यावेळी इंडस्ट्रीत होते. या सर्वांमध्ये प्रचंड ईर्षा होती. एकमेकांकडून भूमिका हिसकावण्याचे प्रयत्न सुरू होते.”
अमीषा पटेलने ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. करिअरमधील हा तिचा पहिलावहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. यामध्ये तिने हृतिक रोशनसोबत मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर अमीषाने ‘हमराज’, ‘रेस 2’, ‘आप मुझे अच्छे लगने लगे’, ‘हमको तुमसे प्यार है’, ‘भुलभलैय्या’, ‘गदर: एक प्रेम कथा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. गेल्या वर्षी जेव्हा ‘गदर 2’ प्रदर्शित झाला, तेव्हा विविध मुलाखतींमध्ये अमीषा तिच्या करिअर आणि स्टारकिड्सविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती.