आमच्यात एकच समान गोष्ट म्हणजे लैंगिक..; स्वरा भास्करचा पती काय म्हणाला?
स्वरा भास्करने गेल्या वर्षी समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी लग्न केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फहाद स्वरासोबतच्या नात्याविषयी व्यक्त झाला. आमच्यात एकच गोष्ट समान आहे, असं त्याने सांगितलंय.
अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लग्न केलं. या दोघांना राबिया ही मुलगी आहे. नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये स्वरासोबतच्या नात्याविषयी फहाद मोकळेपणे व्यक्त झाला. कोणकोणत्या गोष्टींबद्दल दोघांमध्ये भिन्नता आहे, याविषयी त्याने सांगितलं. “स्वराची आई जेएनयूमध्ये प्राध्यापिका आहे, तर तिचे वडील नौदल अधिकारी होते. ते इंग्रजी वृत्तपत्रात स्तंभलेखनही करायचे. याविरोधात माझ्या कुटुंबात कोणी दहावीसुद्धा पास झाले नाहीत. माझ्या कुटुंबात मलाच उच्चशिक्षणाची संधी मिळाली. मी टाटा इन्स्टिट्यूटमधून पीएचडी पूर्ण केलं”, असं फहाद म्हणाला.
स्वरा आणि त्याच्यात ग्रामीण-शहरी फरक कसा आहे, याविषयीही त्याने पुढे सांगितल. “मी बरेलीचा आहे, जो जिल्हासुद्धा नाही. मी ओबीसी वर्गात मोडणारा पसमंदा मुस्लीम आहे. तर स्वरा ब्राह्मण आहे. आम्हा दोघांमध्ये फक्त एकच गोष्ट समान आहे ती म्हणजे ‘सेक्शुअल ओरिएंटेशन’ (लैंगिक प्रवृत्ती). आम्ही दोघं स्ट्रेट (समलैंगिक नसलेले) आहोत. आम्ही दोघांनी जात, धर्म, शहर-गाव, वर्ण हे सर्व अडथळे पार केले आहेत. हे आव्हानात्मक आहे, पण तितकंच मजेशीरही आहे.” यावर स्वरा म्हणाली, “आमच्यात आणखी एक फरक आहे, ते म्हणजे मी त्याच्यापेक्षा वयाने मोठी आहे.” हे ऐकून फहाद म्हणतो की स्वरा नेहमीच ही गोष्ट सर्वांना सांगते, पण याने त्याला कोणतीच समस्या नाही. कारण त्यात लपवण्यासारखं काहीच नाही.
View this post on Instagram
16 फेब्रुवारी 2023 रोजी स्वराने समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमदशी निकाह केला होता. या दोघांनी धर्माची भिंत ओलांडून आपल्या प्रेमाला एक नवीन ओळख दिली होती. आधी कोर्ट मॅरेज आणि त्यानंतर धूमधडाक्यात हे लग्न पार पडलं होतं. ‘बुद्धिमान लोक म्हणतात की फक्त मूर्खच घाई करतात. फहाद आणि मी लग्नासाठी घाई नक्की केली, पण त्याआधी आम्ही तीन वर्षे एकमेकांचा चांगले मित्र होतो. हे एक असं प्रेम होतं, जे आमच्या दोघांपैकी कोणीच त्याला उमलताना पाहिलं नव्हतं. कदाचित आमच्यात बरेच मतभेद होते, म्हणून असं असेल. हिंदू आणि मुस्लीम.. अशा दोन वेगळ्या धर्मांचे आम्ही आहोत. मी फहादपेक्षा वयाने मोठी आहे आणि आमचं विश्व वेगवेगळं आहे. एका मोठ्या शहराची मुलगी, जिचे कुटुंबीय इंग्रजीत बोलतात आणि एक छोट्या शहराचा मुलगा, जो पारंपरिक पश्चिमी यूपी कुटुंबातून आहे. तो उर्दू आणि हिंदुस्तानी बोलतो. मी हिंदी चित्रपटांमधील अभिनेत्री आहे, तर तो एक रिसर्च स्कॉलर, सामाजिक कार्यकर्ता आणि राजनेता आहे. मात्र आम्हा दोघांमध्ये एक गोष्ट सामान्य होती, ती म्हणजे शिक्षण. यामुळे प्रत्येक क्षेत्राकडे आम्ही सामान्य दृष्टीकोनातून पाहू लागलो. मग ती भाषा असो, समाज असो किंवा मग देश’, असं स्वराने सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये लिहिलं होतं.