‘फॅमिली मॅन 3’मधील अभिनेत्याचा मृत्यू, मित्रांसोबत जंगलात फिरायला गेला पण…
'फॅमिली मॅन 3'मध्ये काम केलेल्या एका अभिनेत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. तथापि, ही घटना कशी घडली याचा तपास अजूनही सुरू आहे. रोहित त्याच्या मित्रांसोबत फिरायला गेला होता,पण तिथून तो जिवंत परतलाच नाही. नेमकं काय घडलं ?

अभिनेता मनोज वाजपेयी आणि जयदीप अहलावत यांची महत्वपूर्ण भूमिका असलेली ‘फॅमिली मॅन 3’ सर्वांनाच माहीत आहे, ती अतिशय लोकप्रिय वेबसीरिजही ठरली. मात्र याच वेबसीरिजमधील कलाकारांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये काम केलेल्या अभिनेत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी आणि तितकीच धक्कादायक घटना घडली आहे. रोहित बासफोर असे मृत अभिनेत्याचे नाव आहे. तो त्याच्या मित्रांसह आसामच्या गरभंगा जंगलात फिरायला गेला होता असे सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धबधब्यामध्ये पडून रोहितचा मृत्यू झाला. मात्र त्याच्या कुटुंबियांकडून वेगळीच माहिती मिळत आहे. रोहीत हा काही महिन्यांपूर्वीच त्याच्या घरी परत आला होता.
रोहित हा ‘फॅमिली मॅन 3’ या हिट वेब सिरीजचा भाग आहे. मात्र त्याच्याबद्दल आलेल्या या मोठ्या बातमीमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. रोहित त्याच्या मित्रांसोबत फिरायला गेला होता, त्याच्या ग्रुपमध्ये 9 लोक होते. स्थानिक बातम्यांचा हवाला देत टाईम्स नाऊच्या वृत्तात म्हटले आहे की, रोहित हा दुपारी 2.30 च्या सुमारास घराबाहेर पडला, परंतु काही वेळानंतरच त्याचा फोन लागणं बंद झालं आणि घरचे सगळे काळजीत पडले.
मित्रांनी दिली माहिती
मात्र, नंतर त्याच्या मित्रांनी फोन करून अपघाताची माहिती दिली आणि रोहितला रुग्णालयात नेण्यात आले. पण, तो रुग्णालयात पोहोचेपर्यंत बराच उशीर झाला होता, त्याला तेथे मृत घोषित करण्यात आलं. पोस्टमार्टमपूर्वी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. रोहित त्याच्या नऊ मित्रांसह पिकनिकला गेला होता तेव्हा तो धबधब्यामध्ये पडला असा दावा करण्यात येत आहे. “आम्हाला दुपारी 4 वाजता या घनेचीमाहिती मिळाली आणि आम्ही 4:30 वाजता घटनास्थळी पोहोचलो. नंतर एसडीआरएफ टीमने संध्याकाळी 6:30 वाजता मृतदेह बाहेर काढला.” अशी माहिती याप्रकरणी एका अधिकाऱ्याने दिली.
कुटुंबियांचा वेगळाच दावा
मित्रांसोबत फिरायाला गेलेला रोहित हा चुकून धबधब्यामध्ये पडला, असे प्राथमिक तपासात आढळलं आहे. सध्या तरी कोणताही गैरप्रकार झाल्याचा संशय नाही, असे पोलिसांनी सांगितलं. रोहितचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. मात्र, दुसऱ्या एका वृत्तानुसार, रोहितच्या कुटुंबाने वेगळाच दावा केला आहे. याप्रकरणात काही गूढ असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या सांगण्यानुसार काही दिवसांपूर्वी रोहीत हा हा पार्किंगच्या वादात अडकला होता. रोहितच्या कुटुंबियांनी काही लोकांवर संशयही व्यक्त केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.