‘ॲनिमल’मध्ये 3 लग्न करणारा बॉबी देओल पत्नीबद्दल म्हणाला, “गेल्या 28 वर्षांपासून..”
अभिनेता बॉबी देओल आणि त्याचा भाऊ सनी देओल हे नुकतेच कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये पाहुणे म्हणून आले होते. यावेळी बॉबी देओल त्याच्या 'ॲनिमल' चित्रपटातील भूमिकेविषयी बोलताना खऱ्या आयुष्यातील पत्नीबद्दल व्यक्त झाला.
कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये अभिनेता सनी देओल आणि बॉबी देओल पाहुणे म्हणून उपस्थित होते. या शोच्या एका सेगमेंटमध्ये बॉबीसाठी चाहत्यांकडून आलेली पत्रं कपिल शर्मा वाचून दाखवत असतो. त्यात एक चाहता बॉबीची प्रत्येक गोष्ट कॉपी केल्याचं सांगत असतो. त्यात तो ‘ॲनिमल’ या चित्रपटातील बॉबीच्या भूमिकेचा उल्लेख करतो. बॉबीची प्रत्येक गोष्ट कॉपी केली मात्र ‘ॲनिमल’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेप्रमाणे तीन वेळा लग्न करता आलं नाही, कारण माझी पत्नी त्यासाठी परवानगी देत नव्हती, असंही तो मस्करीत या पत्रात लिहितो. हे ऐकताच सनी आणि बॉबी देओलसह उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो.
चाहत्याला प्रतिक्रिया देताना बॉबी लिहितो, “समस्या ही आहे की आम्ही देओल खूप रोमँटिक आहोत. आमचं मन भरतच नाही. पण खरं प्रेम अस्तित्त्वात असतं आणि गेल्या 28 वर्षांपासून मी विवाहित आहे. मी खूप नशिबवान आहे की मला साधी, सुंदर आणि उत्कृष्ट महिला भेटली, जिचं नाव तान्या आहे आणि ती माझी पत्नी आहे.” संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटात बॉबीने नकारात्मक भूमिका साकारली होती. तो या चित्रपटात अबरारच्या भूमिकेत होता. चित्रपटातील कथेनुसार तो तीन वेळा लग्न करतो.
View this post on Instagram
बॉबी देओलने इंडस्ट्रीत एक काळ गाजवला आणि काही काळानंतर तो आता पुन्हा एकदा त्याच्या कामामुळे चर्चेत आला आहे. त्याचा चाहतावर्ग आजही कायम आहे. चित्रपटांशिवाय बॉबीने वेब विश्वातही आपली छाप सोडली आहे. ‘आश्रम’सारख्या सीरिजमध्ये त्याने दमदार काम केलं. बॉबी आणि तान्याची लव्ह-स्टोरी 1990 मध्ये सुरू झाली होती. ओळखीच्या मित्रांद्वारे या दोघांची पहिली भेट झाली होती. पहिल्या भेटीतच दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. अखेर 30 मे 1996 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. बॉबी देओलप्रमाणे तान्या फिल्म इंडस्ट्रीतून नाही. ती इंटेरिअर डिझायनर आहे. या दोघांना आर्यमान आणि धरम देओल ही दोन मुलं आहेत.
बॉबीने करिअरची सुरुवात लहानपणापासूनच केली. ‘धर्मवीर’ चित्रपटात त्याने बालकलाकार म्हणून भूमिका पार पाडली. त्यानंतर बॉबीने ‘बरसात’मधून मुख्य अभिनेता म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. ‘सोल्जर’, ‘बादल’, ‘बिच्छू’, ‘हमराज’ आणि ‘अजनबी’ यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या भूमिका विशेष गाजल्या.