मुंबई: बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमानने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. सलमानची एक झलक पाहण्यासाठी वाढदिवशी चाहत्यांनी त्याच्या घराबाहेर तुंबड गर्दी केली होती. ही गर्दी इतकी वाढली की नंतर पोलिसांना त्यावर लाठीचार्ज करावा लागला. सलमानला भेटण्यासाठी देशभरातून चाहते त्याच्या घराबाहेर जमा झाले होते. प्रत्येक चाहत्याला सलमानची भेट घेणं शक्य होत नाही. मात्र काही असे चाहते असतात, जे त्यांच्या कामामुळे सलमानचं लक्ष वेधून घेतात. अशाच एका चाहत्याने सलमानचं लक्ष वेधून घेतलं आहे.
देशभरातील विविध राज्यांमध्ये सध्या कडाक्याची थंडी आहे. अशा थंडीत सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक चाहता जबलपूर इथून आला. या चाहत्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो जबलपूरहून सायकल चालवत मुंबईला आला. त्याच्या सायकलवर ‘बीईंग ह्युमन’ हे सलमानच्या संस्थेचं नाव लिहिलं आहे. या सायकलवर त्याने एक पोस्टरसुद्धा लावला आहे. ‘चलो उनको दुआएं देते चलें’ असं त्यावर लिहिलं आहे.
जबलपूरहून सायकल चालवत आलेल्या या चाहत्याची खास भेट सलमानने घेतली. त्याच्यासोबत फोटोसुद्धा क्लिक केले. या चाहत्याला जबलपूरहून मुंबईला सायकलवर यायला पाच दिवस लागले. निघताना त्याच्या मित्रांनी गोड दही खायला देऊन त्याला निरोप दिला होता.
सलमानचा वाढदिवस हा त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठा इव्हेंट असतो. त्याच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील ‘गॅलेक्सी’ या बंगल्याबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी होते. यंदा ही गर्दी इतकी वाढली होती की पोलिसांनी अखेर हस्तक्षेप करत त्यावर लाठीचार्ज केला.