मुलींच्या बर्थ सर्टिफिकेटवरील धर्माच्या सेक्शनमध्ये फरहान अख्तरने काय लिहिलं? जावेद अख्तर यांचा खुलासा
गीतकार जावेद अख्तर हे नेहमीच आपले विचार मोकळेपणे मांडतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते मुलांना शिकवल्या जाणाऱ्या नैतिक मूल्यांबद्दल व्यक्त झाले. यावेळी त्यांनी मुलगा फरहान अख्तरचं उदाहरण दिलं. फरहानने त्याच्या मुलींच्या बर्थ सर्टिफिकेटवर धर्माच्या सेक्शनमध्ये काय लिहिलं, याचा खुलासा त्यांनी केला.
मुंबई : 28 ऑक्टोबर 2023 | प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी त्यांच्या फरहान आणि झोया या दोन्ही मुलांचं संगोपत धर्मनिरपेक्ष वातावरण केलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, मुलांना नैतिक मूल्यांचं शिक्षण देण्याऐवजी त्यांना रोजच्या जीवनातील उदाहरणं सांगून त्याबद्दल शिकवलंय. या मुलाखतीत त्यांनी फरहान अख्तरच्या मुलींबाबतही खुलासा केला. फरहानला शाक्या आणि अकिरा अशा दोन मुली आहेत. या दोघींच्या जन्म प्रमाणपत्रावरील धर्माच्या सेक्शनमध्ये त्याने काय लिहिलं, याचा खुलासा जावेद अख्तर यांनी केला. सायरस सेजला त्यांनी ही मुलाखत दिली. या मुलाखतीत ते विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाले.
जावेद अख्तर म्हणाले, “मला वाटत नाही की मुलांना नैतिक मूल्यांचं शिक्षण एखाद्या कोर्सद्वारे दिलं जाऊ शकतं. आयुष्यातील अनेक उदाहरणांमधून त्यांना ही गोष्ट शिकवली जाऊ शकते. तुम्ही त्यांना जे करायला सांगता, ते मुलं कधीच करत नाहीत. याउलट ते अशाच गोष्टी करतात जे तुम्ही करताना त्यांना पहायला मिळतं. तुमची नैतिक मूल्ये काय आहेत, विचार काय आहेत, हे ते पाहतात आणि त्यातूनच शिकतात. तुम्ही आयुष्यात कोणत्या गोष्टींचं कौतुक करता, तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत? याच गोष्टी पुढे जाऊन तुमची मुलं शिकतात.”
View this post on Instagram
या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी पुढे सांगितलं की फरहान अख्तरने त्याच्या मुलांच्या बर्थ सर्टिफिकेटमध्ये धर्मासंबंधीच्या सेक्शनमध्ये ‘नॉट अॅप्लिकेबल’ (लागू होत नाही) असं लिहिलं आहे. “जी मूल्ये, जो स्वभाव, जी वागणूक तुमच्या अवतीभोवती आहे, त्यावर दोन पर्याय असू शकतात. एकतर तुम्ही त्यात स्वत:ला मिसळून घ्या किंवा त्याविरोधात उभे राहा. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या वातावरणातूनच लहान मुलांना नैतिक मूल्यांचं अचूक शिक्षण मिळतं”, असं अख्तर पुढे म्हणाले.
बॉलिवूडमधल्या बऱ्याच हिट चित्रपटांमधील गाणी लिहिणारे जावेद अख्तर यांचं पहिलं लग्न हनी ईराणी यांच्यासोबत झालं होतं. त्यांच्यापासून फरहान आणि झोया अख्तर ही दोन मुलं आहेत. हनी यांना घटस्फोट दिल्यानंतर अख्तर यांनी अभिनेत्री शबाना आझमी यांच्याशी निकाह केला.