‘आम्ही चार पैसे कमावल्यावर सुनिल शेट्टी सारख्या लोकांच्या पोटात का दुखतं…’, शेतकऱ्यांचं मोठं वक्तव्य
टोमॅटोच्या वाढत्या दरावर वक्तव्य करणं सुनिल शेट्टी याला पडलं महागात; शेतकऱ्यांनी साधला अभिनेत्यावर निशाणा... सुनिल शेट्टी वादाच्या भोवऱ्यात
मुंबई | 18 जुलै 2023 : देशात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटोच्या वाढत्या दराचा फटका फक्त सर्वसामान्य जनतेलाच नाही तर, प्रसिद्ध सेलिब्रिटींना देखील पडत आहे. टोमॅटोच्या वाढत्या दरामुळे अभिनेता सुनील शेट्टी याने देखील महिन्याचं गणित कोलमडलं असल्याचं वक्तव्य काही दिवसांपू्र्वी केलं होतं. पण टोमॅटोच्या वाढत्या दरावर वक्तव्य करणं सुनिल शेट्टी याला महागात पडलं आहे. सुनिल शेट्टी याच्या वक्तव्यावर सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर, सुनील शेट्टी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पार्सल प्रतिकात्मकपणे अभिनेत्याच्या घरी पाठवले आहेत.
टोमॅटोच्या वाढत्या दरांबद्दल काम म्हणाला होता सुनिल शेट्टी?
‘टोमॅटोचे दर वाढल्यामुळे मी टोमॅटोची खरेदी कमी केली आहे. टोमॅटो अधिक खात नाही. मी स्टार आहे, म्हणून सर्वांना असं वाटतं की या सर्व गोष्टींचा माझ्यावर काही परिणाम होत नसेल. पण असं काहीही नाही, सुपरस्टार असलो तरी या सर्व गोष्टींचा सामना आम्हाला देखील करावा लागतो…’ असं अभिनेता म्हणाला होता.
सुनिल शेट्टी याच्या वक्तव्याचा विरोध करत सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी संतोष मुंडे म्हणाले की, ‘जेव्हा टोमॅटोचे दर २ रुपये प्रती किलोपर्यंत पोहचतात तेव्हा शेतकऱ्यांच्या मेहनतीची कोणाला पर्वा नसते. शेतकऱ्यांना त्यांची मेहनत रस्त्यावर फेकून द्यावी लागते. शेतकऱ्यांच्या व्यथा कोणी समजू शकत नाही. अशा वेळी सुनिल शेट्टी यांच्यासारखी लोकं कुठे असतात..’
संतोष मुंडे पुढे म्हणाले, ‘एका सिनेमासाठी कोट्यवधी रुपयांचं मानधन घेणारा, अनेक महागड्या गाड्यांमध्ये फिरणारा, एच टू ओ व्हॉटरव हजारो रुपये खर्च करणारा सुनिल शेट्टी अनेक हॉटेलांचा मालक आहे. तो वर्षाला १०० कोटी रुपये सहज कमावतो. अशात जर शेतकऱ्यांनी चार पैसे कमावल्यावर सुनिल शेट्टी सारख्या लोकांच्या पोटात का दुखतं..’ असा प्रश्न देखील संतोष मुंडे यांनी उपस्थित केला.
टोमॅटोच्या वाढत्या दरांबद्दल सांगायचं झालं तर, टोमॅटोचे दर १६० रुपये किलो रुपयांबद्दल पोहोचले आहेत. टोमॅटोच्या वाढत्या दराचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. पण टोमॅटोच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य जनतेचं महिन्याचं गणित कोलमडलं आहे. सध्या सर्वत्र टोमॅटोच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा रंगत आहे.