फातिमा सना शेख ‘या’ विकाराने ग्रस्त; ‘दंगल’च्या ट्रेनिंगदरम्यान झालं होतं निदान
'दंगल गर्ल' फातिमा करतेय 'या' विकाराचा सामना; सोशल मीडियावर केला खुलासा
मुंबई- आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री फातिमा सना शेखने ‘अपस्मार’ (Epilepsy) या विकाराने ग्रस्त असल्याचा खुलासा केला. ‘दंगल’ या चित्रपटासाठी ट्रेनिंग सुरू असताना तिला एपिलेप्सीचं निदान झालं. मात्र या गोष्टीचा स्वीकार करायलाच पाच वर्षे लागली, असं ती म्हणाली. ‘एपिलेप्सी जागरुकता महिना’निमित्त फातिमाने इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिने एपिलेप्सीसंदर्भात चाहत्यांना प्रश्न विचारण्यास सांगितलं आणि त्याची उत्तरं मोकळेपणे दिली.
‘एपिलेप्सीचा सामना कसा करतेय’, असा प्रश्न एका युजरने तिला विचारला. त्यावर ती म्हणाली, ‘कुटुंबीय, मित्रमैत्रिणी आणि बिजली यांच्याकडून मला चांगली साथ मिळतेय. काही दिवस चांगले असतात, तर काही फार चांगले नसतात.’
वारंवार आकडी येणं हे प्रमुख लक्षण असलेल्या दीर्घकालीन आजाराला ‘अपस्मार’ असं म्हणतात. एकूण जागतिक लोकसंख्येपैकी 0.3 टक्के ते 0.5 टक्के लोक अपस्माराने ग्रासलेले आढळतात.
एपिलेप्सीचं निदान कधी झालं, असा प्रश्न दुसऱ्या युजरने तिला विचारला. त्यावर तिने लिहिलं, ‘दंगल या चित्रपटासाठी ट्रेनिंग घेताना मला एपिलेप्सीचं निदान झालं. त्यावेळी मला आकडी आली आणि जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मी थेट रुग्णालयात होते. तेव्हा मला समजलं की एपिलेप्सी नावाची पण गोष्ट असते. पहिली पाच वर्षे मी त्या गोष्टीला नाकारत गेले. पण आता मी त्याचा स्वीकार केला आहे.’
आकडी आल्यावर एखादी व्यक्ती एकटी असेल तर काय करावं, कामावर असताना कोणती विशेष काळजी घेते, सतत त्याविषयीची मनात भिती असते का, एपिलेप्सीमुळे इतर कोणती कामं करण्यापासून रोखलं जातं अशी विविध प्रश्न चाहत्यांनी फातिमाला विचारली. फातिमाने त्याची सविस्तर उत्तरं नेटकऱ्यांना दिली.
‘मी ज्या दिग्दर्शकांसोबत काम करते, त्यांना या गोष्टीची कल्पना आधीच देते. त्यांनी नेहमीच माझी साथ दिली आणि मला समजून घेतलं. मला आकडी आल्यावर कराव्या लागणाऱ्या आव्हानांची कल्पना त्यांना आहे. काही दिवस खूप कठीण असतात, पण आता त्याच्याशी कसं जुळवून घ्यायचं हे मी शिकले. हे थोडंसं आव्हानात्मक आहे, पण एवढं चालतंच’, असंही ती म्हणाली.