अनुराग कश्यपला 15 मिनिटांसाठी भेटायचं असेल तर द्यावे लागतील इतके रुपये; शेअर केली रेट लिस्ट
निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपला भेटायचं असेल, त्याच्याशी एखाद्या चित्रपटाबद्दल बोलायचं असेल, सल्लामसलत करायचं असेल तर यासाठी आता तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. खुद्द अनुरागने सोशल मीडियावर पोस्ट लिहित रेस्ट लिस्टच मांडली आहे.
निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपची सोशल मीडियावरील पोस्ट वाचून चाहते आणि नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यापुढे अनुराग कश्यपला भेटायचं असेल तर त्यासाठी तो लोकांकडून पैसे घेणार आहे. ‘नवोदितांना मदत करण्याच्या प्रयत्नात मी स्वत:चा खूप वेळ वाया घालवला आहे’, असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलंय. फिल्म इंडस्ट्रीत येणारे अनेक नवीन कलाकार अनुरागची भेट घेतात आणि त्याच्याकडून विविध सल्ले घेतात. मात्र या सगळ्यात अनुरागचा बराच वेळ वाया जात असल्याने आता त्याने थेट या भेटींसाठी पैसे आकारण्याचा निर्णय घेतला.
अनुराग कश्यपची पोस्ट-
‘नवोदितांना मदत करण्याच्या नादात मी स्वत:चा खूप वेळ वाया घालवला. अत्यंत सर्वसामान्य गोष्टींमध्ये मी अडकून पडलो होतो. पण यापुढे मला अशा कोणत्याही लोकांना भेटण्यात वेळ वाया घालवायचा नाही, जे स्वत:ला क्रिएटिव्हरित्या हुशार असल्याचं समजतात. यापुढे मला भेटायचं असेल तर तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. जर एखाद्याला 15 मिनिटं बोलायची असतील, तर त्यासाठी मी 1 लाख रुपये, अर्ध्या तासासाठी 2 लाख रुपये, एक तासासाठी 5 लाख रुपये स्वीकारेन. हेच माझ्या भेटीचे दर असतील. लोकांना भेटून माझा वेळ वाया घालवून मी थकलोय. जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल की हे आपल्याला परवडू शकतं, तर मला कॉल करा अन्यथा माझ्यापासून लांबच राहा’, अशी पोस्ट अनुरागने लिहिली आहे. त्याचसोबत भेटीसाठीची ही फी लोकांना आधीच भरावी लागेल, असंही त्याने स्पष्ट केलंय.
View this post on Instagram
याबाबतीत अत्यंत गंभीर असून उगाच मला कॉल किंवा मेसेज करू नका, असाही इशारा त्याने दिला आहे. जर तुम्ही मला पैसे दिले तर मी तुम्हाला माझा वेळ देईन, असं त्याने थेट म्हटलंय. “मी इथे परोपकार करायला बसलो नाही. जे लोक शॉर्टकट्सच्या शोधात आहेत, त्यांचा मला वीट आलाय”, अशा शब्दांत त्याने राग व्यक्त केला.
अनुरागच्या या पोस्टवर त्याची मुलगी आलियानेही कमेंट केली आहे. ‘मला जी लोकं मेल किंवा मेसेज करतात, त्या सर्वांना मी ही पोस्ट पाठवते. तुमच्यापर्यंत स्क्रिप्ट पोहोचवण्यासाठी ही लोकं मला मेसेज किंवा इमेल करून त्रास देतात’, असं तिने म्हटलंय.