ट्युशनला जाणाऱ्या तैमुरचा 50 जणांनी केला पाठलाग; तेव्हा सैफने उचललं हे पाऊल
बॉलिवूड इंडस्ट्रीत पापाराझी कल्चर मोठ्या प्रमाणावर पहायला मिळतं. याला स्टारकिड्ससुद्धा अपवाद ठरले नाहीत. सैफ आणि करीना यांचा मुलगा तैमुर अली खान याचा पापाराझी वेड्यासारखं पाठलाग करायचे. एका पापाराझीने तैमुरबद्दलचा एक किस्सा सांगितला.
गेल्या काही वर्षांत बॉलिवूड इंडस्ट्रीत ‘पापाराझी कल्चर’ प्रचंड वाढलंय. सेलिब्रिटी कुठेही असो, जिम, रेस्टॉरंट, कॅफे, सलून.. त्यांच्या मागोमाग पापाराझी पोहोचतात आणि त्यांचे फोटो किंवा व्हिडीओ शूट केले जातात. काही प्रसंगी सेलिब्रिटी स्वत:हून या पापाराझींना बोलावतात तर काही सेलिब्रिटींचा पापाराझींकडून पाठलाग केला जातो. आता नुकत्याच एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर आणि पापाराझी वरिंदर चावला यांनी या पापाराझी कल्चरविषयी बरेच खुलासे केले आहेत. या मुलाखतीत त्याने अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमुर अली खानविषयीचा एक किस्सा सांगितला. तैमुरविषयी पापाराझींमध्ये आजही खूप क्रेझ आहे. मात्र एक काळ असा होता, जेव्हा त्याचे फोटो एखाद्या दिवशी पोस्ट केले नाही तर नेटकऱ्यांकडून पापाराझींना मेसेजसा वर्षाव व्हायचा, असं त्यांनी सांगितलं.
“एक वेळ अशी होती, जेव्हा आम्ही तैमुरचे फोटो पोस्ट केले नाही तर कमेंट्समध्ये लोक विचारायचे, ‘आज तैमुरचा फोटो का नाही आला?’ आम्हाला इन्स्टाग्रामवर डीएम (DM) करून लोक प्रश्न विचारायचे. करीना आणि सैफने सुरुवातीला परवानगी दिली होती, म्हणून आम्ही त्याचे फोटो क्लिक करण्यास सुरुवात केली होती. तैमुरचे फोटो प्रचंड व्हायरल व्हायचे. लोकांना तो खूप आवडायचा, म्हणून पापाराझींनीही त्याचे फोटो क्लिक करायला वेडे झाले होते”, असं वरिंदर यांनी सांगितलं.
याविषयी ते पुढे म्हणाले, “करीनाने कधीच फोटोग्राफर्सना नकार दिला नाही. आम्हाला तैमुर त्यांच्या घराबाहेर दिसायचा आणि तेव्हा त्याचे फोटो काढण्यापासून तिनेही आम्हाला रोखलं नाही. डिमांड वाढल्यानंतर आम्ही तरी काय करणार? 24 तास त्याच्या मागे मागे जाण्यास सुरुवात केली. तो शाळेत गेला, ट्युशनला गेला, खेळायला गेला तरी आम्ही त्याचा पाठलाग करायचो. लहान मुलाच्या खासगी आयुष्यात व्यत्यत आणण्यास आम्ही सुरू केलं होतं. तेव्हा त्यांनी आम्हाला विनंती केली की काही ठिकाणी त्याचा पाठलाग करू नका.”
View this post on Instagram
या मुलाखतीत वरिंदर चावला यांनी स्वत: कबुली दिली की तैमुरच्या बाबतीत एका घटनेत सर्व पापाराझींनी खूपच अती केलं होतं. “एकदा मी माझ्या टीम मेंबरच्या बाईकवर मागे बसलो होतो. तैमुर ट्युशनला जात होता आणि तेव्हा मी पाहिलं की जवळपास 40 ते 50 लोक त्याचा बाईकवरून पाठलाग करत होते. मी हादरलोच. ही 50 लोकं कुठून आली, असा मला प्रश्न पडला. त्यात एकाने म्हटलं की, पुढे तमाशा बघ. त्यापैकी एक जण गेटवर चढला, इतरांनी त्याच्या कारला घेरलं. जणू सर्वजण मिळून त्याच्यावर हल्लाच करणार की काय, असं वाटत होतं. मी स्वत: खूप घाबरलो होतो आणि तेव्हा वाटलं की, नाही यार.. हे खूप चुकीचं आहे”, असं ते म्हणाले.
शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्याबाहेर जे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी प्रतीक्षा करायचे, तेसुद्धा तैमुरचे फोटो क्लिक करण्यासाठी पापाराझींच्या घोळक्यात सहभागी झाल्याचा खुलासा चावला यांनी केला. “मी स्वत:च इतका घाबरलो होतो, तर तैमुरच्या कुटुंबीयांना काय वाटलं असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. तैमुरची नॅनीसुद्धा खूप घाबरली होती. त्यावेळी सैफने आम्हाला फोन केला आणि शाळेत जाताना तैमुरचा पाठलाग करू नका अशी विनंती केली. तेव्हा आम्ही त्याचा पाठलाग करण्यास सोडून दिलं. लहान मुलांच्या बाबतीत एक मर्यादा ओलांडायची नाही, असं आम्ही ठरवलं होतं”, अशी कबुली पापाराझी वरिंदर चावला यांनी दिली.