Roger Federer: रॉजर फेडररच्या निवृत्तीवर हंसल मेहतांनी केला असा विनोद; फोटो पाहून भडकले चाहते
करीना कपूरपासून ते अनुष्का शर्मापर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) यांच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
स्वित्झर्लंडचा प्रसिद्ध टेनिसपटू रॉजर फेडररने (Roger Federer) खेळातून निवृत्ती घेतली आहे. रॉजर फेडररने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना निवृत्तीची (Retirement) माहिती दिली. या स्टार टेनिसपटूच्या निवृत्तीची बातमी ऐकून जगभरातील चाहते निराश झाले. रॉजरबद्दल बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनीही सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या आहेत. करीना कपूरपासून ते अनुष्का शर्मापर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) यांच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
रॉजर फेडररच्या निवृत्तीबद्दल बॉलिवूड दिग्दर्शक हंसल मेहता यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. मात्र या पोस्टमध्ये त्यांनी रॉजरऐवजी अभिनेता अरबाज खानचा फोटो शेअर केला आहे. हे शेअर करत हंसल मेहता यांनी लिहिलं, ‘चॅम्पियन आम्ही तुला मिस करणार आहोत.’ यासोबतच त्यांनी #RogerFederer हा हॅशटॅग देखील वापरला आहे. या दोघांच्या चेहऱ्यात किती साम्य आहे हे कदाचित त्यांनी या पोस्टमधून सांगण्याचा प्रयत्न केला असावा असं नेटकरी म्हणत आहेत. मात्र याचसोबत ते ट्रोलदेखील होत आहेत.
Going to miss you champion. #RogerFederer. pic.twitter.com/ZNmQaNROaD
— Hansal Mehta (@mehtahansal) September 16, 2022
‘तुम्हाला खात्री आहे का, की हा फोटो फेडररचा आहे? तो अरबाज खानसारखा दिसतोय,’ असं एकाने लिहिलं. तर दुसऱ्याने विचारलं, ‘तुम्हाला फेडररचा फोटो सापडला नाही का?’ ‘तुम्ही हिंदी चित्रपटसृष्टीच्या वतीने हे पोस्ट करत आहात, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. पुन्हा तुम्हीच म्हणाल की लोक बॉलिवूडवर बहिष्कार का टाकत आहेत,’ अशा शब्दांतही नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला.
रॉजर फेडररने आपल्या कारकिर्दीत 8 विम्बल्डन, 6 ऑस्ट्रेलियन ओपन, पाच यूएस ओपन आणि एक फ्रेंच ओपन जिंकले आहेत. फेडररने पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम पटकावले आहेत. रॉजरने आपल्या चार पानांच्या पोस्टमध्ये दुखापती, फिटनेस आणि वय ही निवृत्तीची कारणं सांगितली आहेत. 41 वर्षीय फेडरर विम्बल्डन 2021 टूर्नामेंटमध्ये खेळला होता. पुढील आठवड्यात लंडनमधील लेव्हर कप ही त्याची शेवटची स्पर्धा असेल.